
खड्ड्यांमुळे डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण झाली आहे. एमआयडीसीचे अधिकारी आणि ठेकेदारांच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि 27 गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी आज रस्त्यात साचलेल्या पाण्यात ‘स्विमिंग आंदोलन’ केले.
के. व्ही. पेंढारकर कॉलेजसमोरील काँक्रीट रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे पाणी साचत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार नसल्यामुळे हे पाणी साचून कायमस्वरूपी तळे तयार झाले आहे. घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदाराने रस्त्याचे निकृष्ट काम केल्याचा आरोप नागरिकांनी अनेकदा केला. मात्र एमआयडीसी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भ्रष्ट कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी सत्यवान म्हात्रे यांनी आज साचलेल्या घाण पाण्यात स्विमिंग आंदोलन केले.