
मराठी माणसामध्ये अस्मितेचा, स्वाभिमानाचा अंगार फुलवून त्याला बलशाली, सामर्थ्यशाली बनवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबरला महानिर्वाण दिन. महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानात त्यांनी हिंदुत्वाचा वन्ही चेतवला. ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ अशी घोषणा देत हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण केले. आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून असंख्य हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर रविवारी शिवतीर्थावर उसळणार आहे.
शिवसेनाप्रमुख म्हणजे धगधगते अग्निकुंड. सहस्त्र्ारश्मी शिवतेज. स्फूर्तीचा जिवंत झरा. मराठी माणसाच्या मनगटातील ताकद त्यांनी जागवली. हिंदूंमध्ये देव, देश आणि धर्माबद्दलचा स्वाभिमान जागृत केला. आजही त्यांचे ज्वलंत विचार असत्याविरुद्ध, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लढण्याची प्रेरणा देतात. 17 नोव्हेंबर 2012 रोजी हे शिवतेज अनंतात विलीन झाले. पण त्यांच्या विचारांचे तेज आजही कायम आहे. त्यातून तमाम हिंदूंना आणि मराठी माणसाला सदैव स्फूर्ती मिळत राहते. येत्या रविवारी विराट जनसागर त्या स्मृतींना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर नतमस्तक होणार आहे.

























































