स्वतःच्या गावात ग्रामपंचायत सदस्य निवडून दाखवा, काळसेकरांना शिवसेनेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

ओरोस ग्रामपंचायत शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून लढविली असतानाही भाजपचे स्थानिक नेते ग्रामपंचायतमध्ये फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. फोडाफोडीचे राजकारण करणाऱया प्रभाकर सावंत यांनी आपल्या रानबांबुळी गावात तर अतुल काळसेकर यांनी प्राधिकरण क्षेत्रात एक तरी भाजपचा सदस्य निवडून आणून दाखवावा, असे आव्हान ओरोस शिवसेना उपविभागप्रमुख नागेश ओरोसकर यांनी सावंत व काळसेकर यांना दिले आहे, तर ओरोसच्या जनतेचा व पक्षाचा विश्वासघात करणाऱ्या प्रीती देसाई यांनी सरपंचपदाचा राजीनामा देऊन भाजपमधून निवडून येऊन दाखवावे, असे आवाहन महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत यांनी केले आहे.

ओरोस सरपंच प्रीती देसाई यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशाबाबत शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी शिवसेना ओरोस उपविभागप्रमुख नागेश ओरोसकर, उपसरपंच मनस्वी परब, अमित भोगले, मंगला ओरोसकर, लक्ष्मीकांत परब, अरुण चव्हाण, अश्रिया परब, दीपिका कदम, परिणीता कदम, डॉ. प्रवीण सावंत, भगवान परब, योगेश तावडे, देवव्रत वारंग, सागर परब आदी शिवसैनिक उपस्थित होते.

या वेळी जान्हवी सावंत म्हणाल्या की, देसाई यांनी भाजपमध्ये केवळ स्वार्थासाठी प्रवेश केला आहे. देसाई यांनी सुचविलेली ८५ लाखांची कामे आमदार, खासदार फंडातून मंजूर झाली आहेत. प्राधिकरण क्षेत्रात पैसे भरून घंटागाडी सुरू करण्यास सर्व ग्रामस्थ तयार असताना त्यास नकार देणे, एखाद्या कामासाठी एनओसी देण्यासाठी आर्थिक मागणी करणे, ठराव घेण्याअगोदर आपल्या पतींना विचारून मगच तो ठराव घेणे अथवा त्यात बदल करणे, असे देसाई यांचे कारनामे ग्रामपंचायतीत सुरू होते. मग ग्रामपंचायतमध्ये मनमानी कारभार कोणाचा होता? असा प्रश्नही जान्हवी सावंत यांनी उपस्थित केला आहे.

विकासाची बाता मारणारे आणि ओरोस गावच्या जनतेचा विश्वास घात करणारे प्रभाकर सावंत यांनी आपल्या रानबांबुळी गावात तर अतुल काळसेकर यांनी प्राधिकरण क्षेत्रात एक तरी भाजपाचा सदस्य निवडून दाखवावा, असे ओपन चॅलेंज ग्राप सदस्य तथा शिवसेना ओरोस उपविभाग प्रमुख नागेश ओरोसकर यांनी दिले आहे. तसेच किंगमेकर भाई सावंत यांनी आपल्या वॉर्ड मध्ये किती भाजपाचे सदस्य आहेत ते जाहीर करावे, असेही त्यांनी सांगितले.

ओरोस ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची ताकद नाही. त्यामुळे भाजपाने येथे दुसऱ्या पक्षाचे सदस्य चोरण्याचा धंदा सुरु केला आहे. प्रथम दोन सदस्य आणि आता सरपंच विकत घेतला आहे, असा आरोप जान्हवी सावंत यांनी यावेळी केला.