शरयूच्या तीरावर शिवसेनेचा दीपोत्सव

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलेले राममंदिर निर्मितीचे स्वप्न साकार होत आहे. राममंदिर निर्मितीसाठी शिवसैनिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. याची आठवण म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरील मातीचे शिवसैनिकांनी लक्ष्मण किल्ल्यावर पूजन केले. या मातीच्या साक्षीने राममंदिर भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला शरयू तीरावर 492 दिवे पेटवून शिवसैनिकांनी दीपोत्सव साजरा केला.

अयोध्येतील राममंदिराच्या जागी बाबराने 492 वर्षांपूर्वी मशीद उभारली. याठिकाणी पुन्हा राममंदिर उभे राहत आहे. यानिमित्त हे 492 दिवे प्रज्वलित करण्यात आले असल्याचे मीरा भाईंदरचे  नगरसेवक विक्रम प्रतापसिंग यांनी सांगितले. विक्रम प्रतापसिंग यांच्यासह अयोध्येत दाखल झालेल्या शिवसैनिकांनी ट्रस्टचे विश्वस्त नित्यगोपालदास यांची भेट घेतली. यावेळी नित्यगोपालदास यांनीही शिवसेनेचे राममंदिर उभारणीत मोठे योगदान असल्याचे सांगत शिवसेनाप्रमुख व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले, असे प्रतापसिंग म्हणाले.  

शरयूचे जल स्मृतिस्थळा

राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावरील मातीचे शरयूत विसर्जन केले जाईल. येथील पवित्र जल घेऊन शिवसैनिक स्मृतिस्थळावर येऊन हे जल तिथे अर्पण करणार आहेत. हिंदुहृदयसम्राट आणि रामजन्मभूमीच्या असलेल्या अतूट नात्याचे हे प्रतीक असल्याचे प्रतापसिंग म्हणाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरील मातीचे शिवसैनिकांनी लक्ष्मण किल्ल्यावर पूजन केले.

आपली प्रतिक्रिया द्या