चारा छावण्या सुरू करा; अन्यथा नगर-पुणे महामार्गावर ‘रास्ता रोको’चा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

कोणतीही पूर्व सूचना न देता जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या चारा छावण्या बंद केल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना अशा प्रकारचा निर्णय घेणे योग्य नसून छावण्या सुरू करा या मागणीसाठी सोमवारी नगर-पुणे महामार्गावर जनावरांसह ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेसह अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले ,सभापती रामदास भोर ,बाळासाहेब हरळी, अशोक दरेकर ,गोरक्ष काळे, गोरख काळे, भानुदास धामणे ,सोमनाथ दरेकर ,दगडू कडूस, वसंत खडूस यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की ,नगर तालुक्यातील सारोळा कासार, भोजपुरी व इतर ठिकाणच्या चारा छावण्या बंद केल्या आहेत. छावणी चालकांना सरकारच्या विविध तपासणी पथकाने भेटी दिल्या. शेरेवहीत छावण्या बंद करण्याच्या बाबतीत कोणतीही सूचना किंवा लोकांची कोणतेही तक्रार नाही. तरीही वर्तमानपत्रात छावणी चालकांच्या संस्थांची नावे देऊन छावण्या बंद केल्याचे म्हटले आहे. नगर तालुक्यांमध्ये माणसांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. घोसपुरी पाणीपुरवठा योजना पाणी नसल्यामुळे बंद आहे. अनेक ठिकाणी टँकर मागणीचे प्रस्ताव ग्रामपंचायती आणि प्रशासनाकडे येत आहे .या परिस्थितीमध्ये प्रशासनाने कुठलीही बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील छावण्या सुरू ठेवणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे .अद्यापपर्यंत छावणी चालकांची बिले शासनाकडून येणे आहेत तरीही ते शासनाचे काम उसनवार रकमा घेऊन शेतकऱ्यांना चारा पुरवठा करीत आहे. त्यामुळे छावणीचालक कर्जबाजारी झाले आहेत. तरी शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी सेवा म्हणून ते छावण्या चालवत आहेत. त्यामुळे प्रशासनाने छावण्या सुरू ठेवणे गरजेचे आहे,

चारा छावण्या सुरू झाल्या नाही तर सोमवारी सकाळी 10 वाजता नगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौकामध्ये जनावरांसह सर्व शेतकरी रास्तारोको आंदोलन करतील. जोपर्यंत छावण्या सुरू होत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.