
सामना ऑनलाईन,मुंबई
शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी 19 जून रोजी शीव येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त राज्यभरातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा या वेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील ग्रामीण भागातील तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, संपर्क संघटक, विधानसभा संपर्कप्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही यासंदर्भात या वेळी मार्गदर्शन शिबिरातून माहिती दिली जाणार आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले आणि संभाजीनगर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हेसुद्धा या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे प्रास्ताविक व संकल्पना शिवसेना उपनेते व समन्वयक विश्वनाथ नेरूरकर हे विशद करणार आहेत.
शिवसेनेचे जिल्हा पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष, उपमहापौर, महापौर तसेच मुंबई व ठाणे शहरातील नगरसेवक आणि विभागप्रमुख यांनी आवर्जून उपस्थित राहायचे आहे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार, सचिव, समन्वयक, संघटक तसेच मंत्री आणि इतर संलग्न संघटनेचे पदाधिकारीही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.


























































