‘अजित मल्टिस्टेट’कडून सावकारी पद्धतीने कर्जवसुली, शिवसेनेचे खंडाळ्यात उपोषण आंदोलन

कर्जदार आणि जामीनदारांच्या जमिनी हडप करण्यासाठी सावकारी पद्धतीने कर्जवसुलीचे तंत्र अवलंबिणाऱ्या अजित मल्टिस्टेट सोसायटीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सातारा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खंडाळ्यात आमरण उपोषण सुरू केले आहे.

सोसायटीच्या गैरकारभाराची सीआयडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी, संस्थेचे अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापक यांच्याविरुद्ध फसवणूक तसेच ‘ऍट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि सोसायटीची मान्यता रद्द करावी, या मागण्यांसाठी खंडाळा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

कर्जदार कर्जाची पूर्ण परतफेड करण्यास तयार असताना तसे न करता जामीनदारांच्या जमिनींवर डोळा ठेवून त्यांना सोसायटीकडून नाहक त्रास दिला गेल्यामुळे शिवसेनेने या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्जदार व जामीनदार यांना न्याय मिळण्यासाठी जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी या उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतरही सोसायटीला उपरती झाली नाही. त्यामुळे अखेर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.