चिपळूणात शिवसेना महिला आघाडीचा विराट मेळावा

1017

आपल्या समस्यांची जाण आणि विकासाची तळमळ असलेला आमदार आपल्याला मिळाला आहे, हे आपले भाग्य आहे. आपली विक्रमी उपस्थिती आणि उत्साह म्हणजे नवरात्रोत्सवापूर्वी सुरू झालेला नारीशक्तीचा जागर आहे. हा जागर मतदानापर्यंत असाच ठेवून विधानसभा निवडणूकीत भगवा फडकवूया, असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ शुभा राऊळ यांनी केले.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाच्या माहिला आघाडीच्या वतीने स्वामी मंगल हॉल मध्ये प्रथम ‘ती ‘ महिला संम्मेलन आयोजीत करण्यात आले होते. या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे प्रमोद पवार, जि.प. सभापती विनोद झगडे, महाराष्ट्र बचत गट महासंघाच्या अध्यक्षा सौ संजना घाडी, नगरसेविका सौ शितल म्हात्रे, सौ सीमाताई चव्हाण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क संघटक सौ नेहा माने, जिल्हा संघटक वेदा फडके, उपजिल्हा संघटक रश्मी गोखले, विधानसभा क्षेत्र संघटक ऐश्वर्या घोसाळकर, तालुका संपर्क संघटक सौ वंदनाताई शिंदे, देवरूखच्या सभापती सोनाली निकम, उपसभापती अजित गवाणकर उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, चिपळूण तालुका संघटक सुप्रिया सुर्वे, शहर संघटक वैशाली शिंदे, देवरुख शहर संघटक निलम हेगशेटये, जि.प. सदस्या सौ. रचना महाडीक, सौ. दिप्ती महाडीक, सौ मुग्धा जागुष्टे, न.प. गटनेत्या जयश्री चितळे, धनश्री शिंदे, प्रज्ञा धनावडे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. शुभा राऊळ पुढे म्हणाल्या, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणाचा सर्वाधिक विकास हा शिवसेनेने केला आहे. आपले आमदार सदानंद चव्हाण यांनी गेली १० वर्ष आपली सेवा केली आहे. ही स्त्री शक्ती एकदा का एकवटली की विरोधकांना पळता भूई थोडी होईल. आपला आमदार हे संवेदनशील आणि सुसंस्कृत  आहेत. त्यांच्या विजयासाठी आपल्याला घराघरात मतदारापर्यंत पोहोचायचे आहे. आपल्या विकासाची तळमळ आहे म्हणूनच आपण या आमदार भावासाठी इतक्या मोठ्या संख्येने आणि विश्वासाने आला आहात. हाच विश्वास कायम ठेवून चिपळूण विधानसभा निवडणूकीत भगवा फडकवूया, असे आवाहन डॉ.राऊळ यांनी उपस्थित महिलांना केले.

यावेळी बोलताना महिलांच्या रेकॉर्ड ब्रेक उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करून आपण या भावासाठी २५ दिवस द्या तुमचा भाऊ पुढची ५ वर्ष तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहील, असा विश्वास आमदार सदानंद चव्हाण यांनी उपस्थित भगिनींना दिला. २००६ साली चिपळूण शिवसेनेने पहिल्यांदाच मोठा मेळावा घेतला होता त्यावेळी तब्बल साडेसहा हजार महिलांची उपस्थिती होती. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी या महिला भगिनींचे कौतूक केले होते, याची आठवण आम. चव्हाण यांनी करून दिली. माझ्या दोन्ही विजयात या मायभगिनींचा मोलाचा वाटा आहे. येत्या निवडणूकीतही ती परंपरा कायम राहील, असे चव्हाण यानी सांगितले.

यावेळी नेहा माने, संजना घाडी, शितल म्हात्रे यांनी देखील मार्गदर्शन केले. संमेलनाचे प्रास्ताविक जयश्री चितळे यांनी तर सुत्रसंचलन नीता महाडीक यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या