
सामना प्रतिनिधी । अलिबाग
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने येत्या १ मार्चला दुपारी चार वाजता पक्ष कार्यकर्ता मेळावा आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग येथे समुद्र किनाऱ्या जवळील जे. एस. एम कॉलेज मैदानावर होणाऱ्या या पक्ष मेळाव्याला, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यातील १२ तालुक्यातील सामाजिक संघटनांना शिवसेनेच्या वतीने १२ अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे वितरण केले जाणार आहे. ग्रामीण भागात आजही चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. अशावेळी आपत्कालीन परिस्थितीत उपचार न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे अशा रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलवता यावे यासाठी सुसज्ज रुग्णवाहिकांची गरज असते. हिबाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून या १२ रुग्णवाहिकांचे वितरण केले जाणार आहे. तसेच अलिबाग शहर शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री खासदार अनंत गीते यांच्या माध्यमातून यापूर्वी जिल्ह्यात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले होते. जिल्ह्यात पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक टॅब देण्यात आले होते. तर माणगाव येथे एका अत्याधुनिक कार्डीयाक रुग्णवाहिकेचे वितरण करण्यात आले होते. याच धर्तीवर आता प्रत्येक तालुक्याला सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सामाजिक संस्थाच्या माध्यमातून या रुग्णवाहिका कार्यरत राहतील, अशी माहिती किशोर जैन यांनी यावेळी दिली.
भाजपशी युती व्हावी ही तर तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे शिवसेना भाजप युती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जागा वाटपात ज्या जागा मिळतील त्या आम्ही लढू ज्या जागा भाजपला जातील त्यांना तिथे पूर्ण क्षमतेने मदत करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमची युती नैसर्गिक आहे. पण शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी नैसर्गिक नाही, त्यामुळे युतीचा शिवसेनेला फायदा झाला तरी राष्ट्रवादीला आघाडीचा फायदा होणार नाही, असेही जैन यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी संपर्कप्रमुख विलास चावरी, विजय कवळे, अलिबाग मुरुड संघटक सतीश पाटील, माजी तालुका प्रमुख दिपक रानवडे, अलिबाग संघटक अड. सुशील पाटील, शहरप्रमुख संदीप पालकर, शंकर गुरव, अजित गुरव उपस्थित होते.





























































