
श्रीमती रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्था संचालित खोपोली येथील ‘रमाधाम वृद्धाश्रमा’च्या वेबसाईटचे आज संस्थाध्यक्ष चंदूमामा वैद्य आणि शिवसेना सचिव, संस्थेचे विश्वस्त खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे उद्घाटन झाले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून खोपोलीत निसर्गरम्य परिसरात या ‘रमाधाम’ वृद्धाश्रमाची उभारणी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच या वृद्धाश्रमाच्या सुसज्ज नवीन इमारतीचे उद्घाटन केले. या वृद्धाश्रमाची माहिती तसेच वृद्धांच्या सोयीसाठी नोंदणी इत्यादी माहिती सहजरीत्या मिळावी यासाठी www.ramadham.com या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. या वेबसाईटचे आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस वामन भोसले, अनिरुद्ध नारकर हे उपस्थित होते. सदर वेबसाईट निर्माणकार्यात विश्वस्त भूपाल रामनाथकर आणि अमोल मटकर, अमित शिगवण यांचे सहकार्य लाभले.
वृद्धाश्रमाचे कार्यालय शिवसेना भवन, तिसरा मजला, राम गणेश गडकरी चौक, दादर, मुंबई – 400 028 येथे असून सदर कार्यालय रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस सोडून सोमवार ते शनिवार या दिवशी दुपारी 12.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरू राहील. आपण 022-24398311 या कार्यालयाच्या दूरध्वनीवर वृद्धाश्रमाच्या नोंदणी व माहितीसंबंधी संपर्क साधावा, असे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत (चंदूमामा) वैद्य यांनी कळविले आहे.


























































