
शिवसेना कामाच्या बळावर निवडणुका लढवते आणि जिंकते. गटनेत्यापासून नेत्यापर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरून जनतेची कामे करतात. त्यामुळे कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही, असे चोख प्रत्युत्तर शिवसेनेने भाजपच्या आरोपांना दिले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या आरोपांचा आज खरपूस समाचार घेतला.
पालिकेच्या पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱया प्रस्तावित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर प्रभाग रचनेत जाणीवपूर्वक फेरफार सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेनेला पराभवाची भीती असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देताना आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. पालिकेच्या मागील निवडणुकीआधी भाजपने सत्तेचा गैरवापर करीत विभाग फोडून आपले ‘आकडे’ वाढवले. मात्र आता सत्तेत नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
पालिकेत आणि पर्यायाने मुंबईत आपण रसातळाला जाऊ अशी भीती भाजपला वाटत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. निवडणुका हा लोकशाहीचा भाग आहे. त्यामुळे कधीही निवडणुका झाल्या तरी शिवसेना सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचा विश्वासही महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला. भाजपचे आरोप म्हणजे केवळ ‘बकवास’ असल्याचा पलटवार खासदार अरविंद सावंत यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले ‘कुटुंबप्रमुख’ वाटतात. सरकारचे उत्तम काम सुरू असताना भाजपकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचेही सावंत म्हणाले.
कोरोना नियंत्रणात असेल तर निवडणुका वेळेतच होणार!
मुख्यमंत्र्यांना अनुभव नसल्याचा आरोप भाजपकडूनच केला जात होता. मात्र समाजाचे काम करण्यासाठी अनुभव नाही, तर इच्छाशक्ती लागते, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवले. त्यामुळे केवळ मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्र आणि देशपातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्या कामाचा गौरव होत असल्याचे महापौर पेडणेकर म्हणाल्या. पुढील वर्षी फेब्रुवारीत कोरोना नियंत्रणात असला तर निवडणुका निश्चितच वेळेत होतील असे ठामपणे सांगतानाच कोरोना नियंत्रणात नसला तर मात्र निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील असेही त्यांनी स्पष्ट केले.






























































