वाजवी दरात, बाप्पा आपल्या घरात; शिवसेनेच्या उपक्रमाचा मूर्तीकार, गणेशभक्तांना फायदा

633

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले गणेशभक्त आणि मूर्तिकारांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या विलेपार्ले विभागाच्या वतीने ‘वाजवी दरात, बाप्पा आपल्या घरात!’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये पेण, खोपोलीच्या इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अत्यंत माफक दरात गणेशभक्तांना देण्यात येत आहेत.

लॉकडाऊनमुळे मागणी घटल्याने पेणसारख्या अनेक भागातील मूर्तीकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे मुंबईतील अनेकांचे रोजगार गेल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या स्थितीत मूर्तींचा दरही वाढल्याने गणेशभक्तांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशभक्तांना घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाजवी दरात गणेशमूर्ती देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एक ते चार फुटांपर्यंतची मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पेण आणि खोपोलीतून या मूर्ती आणण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मूर्तीकारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. विलेपार्ले, अंधेरी विभागातील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विले पार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, अनिल खांडेकर, अमित जोशी, जितेंद्र शिर्के, रवींद्र घाडीगावकर, किसन पोटेकर, राजेश रोकडे, संतोष ताम्हणकर परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाचा लाभ विले पार्ले, अंधेरी विभागातील गणेशभक्तांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या