अजित पवार आणि शिंदे यांचे पक्ष नसून ते गट आहे,हे जनतेने निवडणुकीतून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता निकालानंतर त्यांच्या गटात अस्वस्थता आहे. ती आता स्पष्ट होत आहे. तसेच हे गट म्हणजे अळवावरचे पाणी फक्त बुडबुडे आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या या छत्र्या भविष्यात नष्ट होतील, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांनी अजित पवार गट आणि मिंधे यांची सालटी सोलली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील जो पक्ष आहे, तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हे जनतेने सिद्ध केले आहे. त्यामुळे जे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणवतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. तसेच ज्यांना अमित शहा यांनी धनुष्यबाण दिले आहे, ती खरी शिवसेना नाही. तसेच अमित शहा यांनी ज्यांना घड्याळ दिले आहे, ते खरे पक्ष नाही, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असेही त्यांनी ठकाणवून सांगितले.
पैसे आणि यंत्रणेच्या जोरावर त्यांनी काही जागा मिळवल्या असतील. मात्र, त्यांच्यातच अस्वस्थता आहे. स्वतःला पक्ष म्हणवणारे अळवावरचे पाणी फक्त बुडबुडे आहेत. पावसाळ्यात बेडूक येतात, पावसाळ्यानंतर निघून जातात. सध्या त्यांचा पावसाळा सुरू आहे. खरे तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वःतची मते नाहीत. त्यांना जी मते मिळाली आहेत, ती भाजपची आहेत. शिंदे यांनी तीन ते चार लाख मते विकत घेतली, तसेच भाजपची मते त्यांना मिळाली, त्यामुळे त्यांचे दोनचारजण निवडून आले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
अजित पवार आणि शिंदे हे फक्त गट आहेत. त्यांना पक्ष म्हणून जनता कधीच मान्यता देणार नाही. त्यांनी ज्या जागा मिळवल्या आहेत, त्या मते विकत घेत जिंकल्या आहेत. त्यांनी विजय विकत घेतला आहे. जनता त्यांच्या पाठिशी नाही, हे स्पष्ट झाले आहे. हे गट म्हणजे पावसाळ्यात उगवलेल्या छत्र्या आहेत, त्या भविष्यात नष्ट होणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी सोडून त्यांच्यासोबत गेलेल्यांची अस्वस्थता निकालानंतर स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.
काहीजण अल्पसंख्याकांचे राजकारण करत आहेत, मात्र अल्पसंख्याक मतावर निवडणुका जिंकता येत नाही. ती त्यांची मजबुरी असेल, तो त्यांचा प्रश्न आहे. छगन भुजबळसोबत असते, तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा टिळा लागला असता. आता त्यांच्यात अस्वस्थता आहे. अजित पवार आणि शिंदे गटातील अनेकांची अस्वस्थता स्पष्ट दिसत असून अनेकजण बाहेर पडण्याच्या आणि इतर पक्षांचा संपर्कात आहेत. मात्र, योग्य वेळ आल्यावर ते सर्वांसोमर येईल, अशा गोष्टी बंद दाराआड होतात, असे सांगत त्यांनी यावर आता बोलणार नाही. योग्य वेळ आल्यावर जनतेला सर्व समजेल, असे संकेतही दिले.