शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा खरा मेळावा आहे, याला अनेक वर्षांची वैचारिक परंपरा आहे. मात्र, सध्या काहीजण डुप्लिकेट शिवसेनेच्या नावाने काहीजण पिपाण्या वाजवत आहेत. आमच्या रणशिंगासमोर या पिपाण्यांना काहीही अर्थ नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा आज परंपरेप्रमाणे होत आहे. मात्र, सध्या दसऱ्याला मेळाव्यांची लाट आली आहे. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचे अधिकार आहेत. मात्र, खऱ्या शिवसेनेचाच आणि शिवतीर्थावर होणाराच मेळावाच दसरा मेळावा आहे. आता भरपूर डुप्लिकेट लोकं येतात आणि मेळावे करतात. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दरवर्षी दसऱ्याला विचाराचं सोनं देशाला आणि महाराष्ट्राला देत राहिले आज तीच परंपरा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थपणे पुढे नेत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
काही लोकांनी पक्ष आणि चिन्ह चोरले असेल पण मूळ शिवसेनेचा विचार आणि जनता आमच्यासोबत आहे. कोणती शिवसेना खरी किंवा खोटी हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. सध्या निवडणूक आयोग मोदी, शहा यांच्या मेहरबानीवर चालत आहे. काही दिवसांनी हा आयोग निवृत्त होौणार आहे. त्यामुळे शिवसेनेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. जनतेने असली शिवसेना कोण आहे, ते दाखवून दिले आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने शिवसेनेचा आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. आज या मेळाव्यात रणशिंग फुकंले जाणार आहे. या रणशिंगांसमोर फुंकण्यात येणाऱ्या पिपाण्यांना काहीही अर्थ नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
या मेळाव्यासाठी राज्यातून आणि देशातून अनेकजण येतील आणि एक नवी दिशा आज मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली आहे. तसाच विजय विधानसभा निवडणुकीतही मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमचा धनुष्यबाण मोदी, शहा यांच्या मदतीने चोरण्यात आला. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री चोरांना मदत करत असतील तर देश चोरांच्या हाती आहे, असेच म्हणावे लागेल. धनुष्यबाण त्यांनी चोरला असला तरी मशाल हेदेखील महत्त्वाचे शस्त्र आहे. छत्रपती शिवाजी महाजारांच्या युद्धनीतीत मशालीचे महत्तव आहे. आपण अनेकदा कात्रजचा घाट शब्दप्रयोग वापरतो. त्या कात्रजच्या घाटाच्या युद्धावेळींही मशालींचा वापर झाला होता, असेही संजय राऊत यांनी संगितले.
हुतात्मा स्मारकातील हुतात्मांच्या हातात मशाल आहे. तीच मशाल आता आमच्या हातात आहे. दिल्लीतील सत्ताधारी आणि व्यापारी मंडळाचे नेते मोदी, शहा महाराष्ट्राची लूट करत आहेत. जे लोकसभेला त्यांच्यासोबत उभे राहिले त्यांनी या सुटीला पाठिंबा दिला, असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र आणि मुंबई लुटण्याचे काम सध्याचे रावण करत आहे. यंदा महाराष्ट्रातीलप रावणदहन अखेरचे असेल, य़ानंतर राज्यात रावण निर्मणच होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असेही संजय राऊत म्हणाले.