
नगर विकास खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढावा आणि नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करण्याची हिंमत दाखवावी, हा त्यांचा अधिकार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दांत फडणवीस यांना सुनावले आहे. फक्त भ्रष्टाचाराचे रडगाणे गात काहीही साध्य होणार नाही, कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यंत्र्यांनी दाखवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय निधीचा अपहार नगर विकास विकास खाते करत असेल तर अमित शहा यांचे लाडके नगरविकास मंत्री आणि केंद्र यांचे या भ्रष्टाचारात संगनमत असल्याचे दिसून येते. एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. या खात्यासाठी MMRDA, 27 महापालिका किंवा इतर संस्थासाठी केंद्राकडून आलेला निधी मिंध्यांनी दुसरीकडे वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल तर हा उघ भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंध्यांना बडतर्फ केले पाहिजे. त्यांना तो अधिकार आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत रडगाणे गात, बातम्या पेरून काहीही साध्य होणार नाही, असे परखड मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठोस भूमिका घेत नगरविकास खात्यात कसा भ्रष्टाचार झाला आहे, हे त्यांनी जनतेला सांगावे. नगरविकास मंत्र्यांनी मुंबईत 2 लाख कोटींची कामे काढली, त्याचा काहीही थांगपत्ता नाही. ठेकेदारांना कामाचे वाटप झालेले आहे. तसेच त्या 2 लाख कोटींवर 25 टक्के आधीच घेतले गेले आहेत. म्हणजे विचार करा, किती पैसे होतात. त्यांनी फक्त कागदावर कामे काढली आहे. प्रत्यक्षात कामाचा काहीही पत्ता नाही. त्यांनी ही कामे परस्पर दिली आहेत. महापालिकेत त्याची काहीही नोंद नाही. त्यांनी 25 टक्के कमीशन घेतले आहे. हा केंद्राचा, राज्याचा नाही तर जनतेचा पैसा आहे. भाजपवाले 50, 70 वर्षापूर्वीचा भ्रष्टाचार काढत आहेत. मात्र, त्यांच्या नाकासमोर वर्षभरात नगरविकास खात्यातील भ्रष्टाचार काढा. नगर विकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रात नवा पायंडा पाडा, अशी मागणीही संजय राऊत यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील निफाड सहकारी साखर कारखाना 2013-14 च्या गळीत हंगामापासून बंद आहे. या कारखान्याताली कामगारांचे वेतन थकले आहे, या कारखान्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, त्यामुळे हा कारखाना सुरु करा अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. अमित शहा यांचे सहकार खाते काम करत असेल तर त्यांनी ही कारखाना सुरू करून द्यावा, अन्यथा त्यांचे खाते फक्त सहकार आयुक्त, सहकारी बँका,सहकारी संस्था यांच्या प्रमुखांना त्यांच्या पक्षात घेण्यसाठी काम करत आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे. तसेच हा कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.