
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मिंधे यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. तसेच सरकारमध्ये हिंमत असेल तर ठोस कारवाई करावी, असे आव्हानही दिले. मिंधे हे स्वतःच बेकायदेशीर असून त्यांच्याकडून कायदेशीर कामांची महाराष्ट्राने अपेक्षा करू नये, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.
मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत जो प्रकार झाला, त्याचे कोणतेही राजकीय भांडवल करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला नाही. ती घटना दुर्दैवी होती. समाजात काही माथेफिरू लोकं असतात. देशभरातील पुतळे, स्मारके यांच्यावर ते असे समाजविघातक कृत्ये करत असतात. शिवसैनिकांनी पुतळ्याचे शुद्धीकरण करत पुतळा स्वच्छ केला. पोलिसांनीही तपास करत एका व्यक्तीला अटक केली आहे. समाजातील माथेफिरू कोणताही राग कशावरही काढतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा राष्ट्रपुरुषांचा असे विकृत अवमान करतात. मात्र, अशा घटनांचे राजकीय भांडवल न करता, त्या माथेफिरूंवर उपचार होणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे यांनी काही बेकायदा कामे केली असतील, मुळातच मिंधे हे स्वतःच बेकादेशीर आहेत. सध्याचे सरकारमधील त्यांचे अस्तित्व, त्यांचे मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह हे त्यांच्याकडे बेकायदेशीरच आहे. अशी बेकायदेशर व्यक्ती कायदेशीर कामे करेल, अशी अपेक्षा महाराष्ट्राने ठेवू नये, असे जबरदस्त टोलाही त्यांनी हाणला.
मिंध्यांनी काही बेकायदेशीर कामे केली असतील, तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ते अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहेत. त्यांनी अशा बेकायदेशी व्यक्तीवर आणि त्यांच्या बेकायदेशीर कामांवर कारवाई केली पाहिजे, याबाबत न्यायालयाला का बोलावे लागत आहेत? असा सवालही त्यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे हे सरकार न्यायालयाचे ऐकत आहे काय? न्यायव्यवस्थाच त्यांनी खिशात टाकली आहे. न्यायालयाने बेकायदेशीर कामे करणाऱ्या नगरविकास मंत्र्यांवर कारवाईचे आदेश द्यावे. नगरविकास खाते हे पैसे खाण्याचे सर्वात मोठे कुरण झाले आहे. मिंध्यांना जी आर्थिक सूज आली आहे, ती नगरविकास खात्यामुळे आलेली आहे. याबाबत न्यायालय आणि फडणवीस यांना माहिती नाही काय? हिंमत असेल तर ठोस कारवाई करावी, फक्त निरीक्षणे नोंदवू नये, असेही संजय राऊत म्हणाले.