मुंबईतील विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपच्या लाडक्या उदोयगपतीकडून होत आहे, ही गंभीर बाब असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाला चांगलेच फोडून काढले. मालवणात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वर्षा बंगल्यावर लपला आहे काय, असा सवाल करत त्यांनी मिंध्यांवर हल्लाबोल केला.
तत्कालीन राज्यपाल, प्रफुल्ल पटेल अशा अनेकांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. हे सर्व भाजपचे प्रोडक्ट आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारी माणसे भाजपात आहेत, हे लक्षात घ्या. यावरून त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे, ते दिसते. मालवणच्या पुतळा दुर्घटनाप्रकरणी अद्यापही मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. पुतळ्याचा ठेकेदार आणि शिल्पकार फरार नसून ते वर्षा बंगल्यातच लपलेले नाहीत ना किंवा ज्या चिल्यांपिल्ल्यांसोबत त्यांचे फोटो दिसतात. त्यांनी तर यांना लपवलेले नाही ना, अशी शंका जनतेला येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे आरोपी फरार नसून सत्ताधाऱ्यांनीच त्यांना लपवले असावे, अशी शंका जनता व्यक्त करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप आमदार मशीदीत घुसून मारीन, अशी भाषा करतात, हे मोदींना मान्य आहे काय, त्यांना हे मान्य असेल तर परदेश दौऱ्यादरम्यान त्यांनी मशीदीत जाऊ नये, असेही राऊत म्हणाले. त्यांनी हा ढोंगीपणा थांबवावा, अशी भाषा वापरणाऱ्यांवर काय कारवाई केली. मशीदीत घुसण्यापूर्वी पाकिस्तानात घुसा आणि दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा. अशी भाषा वापरत जनतेत द्वेष पसरवत, दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.