मुंबईतील विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपच्या लाडक्या उद्योगपतीकडून होत आहे, ही गंभीर बाब असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाला चांगलेच फोडून काढले. स्वतःचे कर्तृत्व नसताना चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या मिंधे आणि अजित पवार यांना मर्दानगिची भाषा शोभत नाही, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई विमानतळ गौतम अदानीच्या म्हणजेच भाजपच्या ताब्यात गेल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही. हा पुतळा गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला आहे. तसेच या पुतळ्याचा जिरेटोप तुटलेला आहे. याबाबत भाजपमधील स्वतःला हिंदुत्वाचे कैवारी म्हणवणारे नेते, भाजप आणि मिंधे गटातील बोगस शिवभक्तांचे काय म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपतीकडून होत असेल तर ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे, असे संजय राऊत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. मात्र, भाजप किंवा मिंधे यांचे ते दैवत नाही, हेच यावरून दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जो स्वाभिमान, अभिमान शिकवला आहे, तो यांच्याकडे थोडाही उरलेला नाही. त्यामुळेच लाडक्या उद्योगपतीने केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ते उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. या पुतळ्याची सुटका करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांवर या उद्योगतीचे 200 बाउन्सर धावून आले. या उद्योगपतीने 200 बाउन्सर ठेवले आहेत, हे गृहमंत्र्यांना माहिती आहे काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडवण्यासाठी गेलेल्यांवर अशाप्रकारे धावून येणारे आणि सत्ताधारी यांची राज्याला लाज वाटत आहे. राज्याच्या राजधानीत छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे आणि ते इतर ठिकाणी जात हिंदुत्वाच्या गोष्टी सांगत आहे, त्यांची राज्याला लाज वाटत आहे, असा घणाघातही त्यांनी केला.
याआधीही अशीच घटना घडली होती. त्यावेळीही शिवसैनिकांनी पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. तसेच आमच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा विमानतळाजवळ उभारण्यात आला. मात्र, आताच्या भाजप, मिंधे गटाला छत्रपती शिवजी महाराजांबाबत श्रद्धा, प्रेम, सन्मान, आदर नाही आणि महाराष्ट्राबाबत स्वाभिमान नाही. कदाचित यापुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरी आणि पुतळे काढून त्याठिकाणी अदानीच्या तसबिरी लावतील, अशी त्यांची अवस्था झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचे कर्तृत्त्व नसताना मोदी- शहा यांच्या ताकतीचा वापर करून पळवतात, त्यांनी मर्दानगिच्या बाता मारू नयेत. त्यांच्यात कतृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात. चोऱ्यामाऱ्या करत राजकारण करणारे मिंधे आणि अजित पवार यांना मर्दानगिची भाषा शोभत नाही.