
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मतचोरीचा मुद्दा करत मतचोरी होते, यालाच त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मतचोरी हा राष्ट्रीय मुद्दा असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मतचोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत नसलेल्या पक्षानांही या मुद्द्याने चिंतीत केले आहे. भाजपमधील केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, काँग्रेसने मतचोरी केली, म्हणजे मतचोरी होते आहे, याला त्यांनीच दुजोरा दिला आहे. मतदार मत देतो, ते नेमके कुठे जाते, हे कळथ नाही, म्हणजे मतचोरी होत आहे. मतपत्रिकेवर दिलेले मत कोणाला दिले, हे मतदाराला समजते. मात्र, ईव्हीएममध्ये तसे होत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्याचे आम्ही स्वागत केलेले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
मराठी माणसासाठी, मुंबई महापालिकेवर मराठी झेंडा फडकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र येत आहेत. त्याचे राज्याने स्वागत केले आहे. यात कोणताही पक्ष किंवा स्वार्थ नाही. दोन भाऊ एकत्र येत आहेत, हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे. त्यात आता राजकारण आणण्याची गरज नाही. दोन भावांची ताकद, त्यांची शक्ती निवडणुकीत दिसेलच. राजकारणात आहोत, तर आम्ही राजकारण करणार. मात्र, दोन भाऊ एकत्र येणे, हा आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस म्हणजे यशवंतराव चव्हाण नाहीत, वसंतराव नाईक नाहीत किंवा वसंतदादा पाटील नाहीत, नशिबाने आले आणि ते खुर्चीत बसले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर त्यांच्या मताला फारशी किंमत नाही. त्यांनी पदाची जाण ठेवत हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. विरोधकांचा आरोप समजून घेत त्यांनी चौकशी केली पाहिजे. पण ते शेरोशायरी, थिल्लरबाजी, चुटक्या, लुटक्या घेणे यातच अडकले आहेत. मिंध्यांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलतात. मात्र, कारवाईची हिंमत नाही. असा दुर्बल मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. त्यामुळे ते अशी थिल्लकबाजी करणारच, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबईला मराठी चेहरा दिल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही. आशिष शेलार गेली अनेक वर्षे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष होते. भाजपमध्ये निवडणुकीपुर्वी काय राजकारण उफाळून आले आहे, माहिती नाही. मात्र, यावेळी त्यांना जावे लागत आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत काहीतरी घडत आहे. हे बदल त्यांचेच संकेत असावेत, असेही त्यांनी सूचक शब्दांत सांगितले.