
शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमित शहा आणत असलेल्या नव्या कायद्याबाबत मत व्यक्त केले. हा कायदा अमित शहा आणि मोदींवर उलटणार आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
देशातील पंतप्रधानांवर अनेक आरोप आहेत. देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांनी एका मित्राला कवडीमोल भावात किंवा फुकटात दिली. अमेरिकेत ज्या मित्रावर लाचखोरीचे आरोप आहेत आणि ज्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याला वाचवण्यासाठी प्रेसिंडट ट्रम्प यांच्यापुढे ऑपरेशन सिंदूरमध्ये शरणागती पत्करली, हा राष्ट्रीय अपराध पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधानांवर गृहमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी आणि त्यांना पदावरून बडकर्फ करावे, आम्ही या कायद्याचे स्वागत करू, असेही ते म्हणाले. त्यांच्याकडे सत्ता, पैसा आणि पोलीस असतात, त्यावेळीच ते मर्द असतात. ज्यावेळी त्यांच्या हातात सत्ता नसेल आणि त्यांच्यावर अटकेची तलवार असेल त्यावेळी हेच लोक या कायद्याच्या भीतीने पळून गेलेले असतील. काँग्रेसने पीएमएलए कायदा आणला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, हा कायदा तुमच्यावर उलटेल. आता अमित शहा यांनी जो कायदा आणला आहे, तो अमित शहा आणि मोदींवरच उलटणार आहे. कालाय तस्मै नमः, हा काळाने घेतलेला सूड आहे. पीएमएलए कायदा काँग्रेसने आणला, त्याचा गैरवापर करत त्यांनी आम्हाला अटकेत टाकले. आता हा जो कायदा अमित शहा आणत आहे, याच कायद्यानुसार भविष्यात हे लोकं तुरुंगात जातील, असे त्यांनी सांगितले.
अमित शहा खोटे बोलण्यात पटाईत, आहेत, ते खोटे बोलण्यात नंबर वन आहेत. ते राज्यमंत्री होते. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे होते. ते परागंदा होते. त्यांच्या सुटकेसाठी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या पलीकडे जात त्यांना मदत केली. तेव्हा आजचे अमित शहा दिसत आहेत. केंद्रात मोदी आल्यानंतर ते निर्दोष सुटले. त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडलेले नाही. त्यांना निर्दोष सोडवून घेण्यात आले. आता न्यायालयाचा गैरवापर करत शिवसेना (उद्धव बाळासेहब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जातोय. तसेच मोदी सत्तेत आल्यानंतर शहा यांना निर्दोष सोडवून घेतले. त्यामुळे त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत. नैतिकतेसारखे शब्द अमित शहा यांच्या तोंडी शोभत नाहीत. अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कशाप्रकारे मदत केली, हे आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहे. ते कसे सुटले, ते आम्हाला माहिती आहे. या मदतीचे पांग यांनी अशाप्रकारे फेडले. उपकाराची जाणीव नसलेले हे क्रूर लोकं आहेत, असे ते म्हणाले.
रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे सांगणारे आज क्रिकेट खेळण्याला पाठिंबा देत आहेत. याा पाठिंबा देणाऱ्यांमध्ये गुजरातचे अमित शहा यांचा मुलगा पुढाकार घेत आहे. त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यात येत आहे. त्यांच्याकडून देशाला राष्ट्रवाद आणि नैतिकता शिकावी लागते, हे देशाचे दुर्दैव आहे. ऑपरेशन सिंदूर त्यांनी ट्रम्प यांच्या दबावामुळे थांबवले. आता ते पाकिस्तानशी क्रिकेट खेळवत आहेत. हं ढोंगी आणि भंपक आहेत. पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याला आमचा विरोध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.