कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांची फसवणूक; उद्धव ठाकरे यांचे टिकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थसंकल्पात विकासाचे मृगजळ दाखवण्यात आले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हातात काहीच पडणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली. अर्थसंकल्पात कंत्राटदारांसाठी ठोस योजना आहेत. मात्र, सर्वसामान्यांना फक्त थापाच देण्यात आल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच शेतकरी कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं निमंत्रण असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणत आहेत की त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला आहे. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याचे दिसत नाही. आम्ही पाच वर्षांपुर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळी अटीशर्थीं, पात्र-अपात्र असे कोणतेही जंजाळ ठेवले नव्हते. फक्त दोनवेळा शेतकरी केंद्रावर गेल्यावर त्यांची कर्जमुक्ती करण्यात येत होती. त्यानंतर कोरोना महामारी आल्याने प्रोत्साहनपर राशी देता आली नव्हती. ती देण्यास सुरुवात केल्यावर आमचे सरकार पाडण्यात आले, असे ते म्हणाले.

आजचा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. लाडक्या बहिणींना 2100 देणार होते, त्याचा कुठेही उल्लेख नाही. मात्र, कंत्राटदारांसाठी ठोस योजना आहेत. योजनेचे सर्व बारकावे नमूद केले आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्यासाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे. विकासाचे मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. राज्याची बिकट परिस्थिती असताना कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प आहे. त्यातून राज्याचे काहीच हित साधले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारला शेतकऱ्यांचे खरेच हित करायचे असेल तर अटीशर्थी, पात्र-अपात्र असे शब्दांचे खेळ करू नये, आम्ही ज्याप्रमाणे कालबद्ध पद्धतीने दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ केले होते. तसे करण्यात यावे. अर्थसंकल्पात अनेकदा 2047 चा उल्लेख झाला. आताची कर्जमाफी सरकार 2047 ला करणार का? असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकरऱ्यांची कर्जमाफी कधीपर्यंत करणार ते स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. अर्थसंकल्पात थापांचे प्रमाण वाढले आहे. थापांचा उन्नत महामार्ग केला आहे. 2047 बाबतचे मृगजळ दाखवण्यापेक्षा आज सर्वसामान्यांच्या हातात काय पडणार ते महत्त्वाचे आहे. तसेच केलेल्या तरतुदींसाठी निधी कुठून आणणार, याचे काहीही नियोजन नाही, असे ते म्हणाले.

विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात येत आहे. तसेच 300 कोटी वृक्ष लागवड करणार असे सांगतात. मात्र, वृक्ष लागवडीसाठी त्यांनी आधी जमीन दाखवावी. फक्त आश्वासनांनी पर्यावरणाचे रक्षण होणार नाही. त्यामुळे ही फक्त थापेबाजी आहे. काहीही ठोस नमूद करण्यात आलेले नाही. आता जी गरज आहे, त्यासाठी हातात काहीही पडत नाही. फक्त कंत्राटदारांची चंगळ व्हावी, यासाठी रस्ते, महामार्ग यावरच भर देण्यात आला आहे. मात्र, त्याचा लाभ जनतेला होणार आहे का, याबाबतचा काहीही विचार करण्यात आलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.