लोकशाहीचा लिलाव आणि निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे ‘पाळीव मांजर’; 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने संजय राऊतांचा जबरदस्त प्रहार

“महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही घडले नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा धक्कादायक प्रकार सध्या सुरू आहे. हा निव्वळ पैशांचा खेळ आणि सत्तेचा गैरवापर असून निवडणूक आयोग या भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचे पाळीव मांजर बनले आहे,” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.

मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत तब्बल 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजप आणि महायुती सरकारवर गंभीर आरोप केले.

‘5-10 कोटींच्या बॅगा घरपोच’

संजय राऊत यांनी दावा केला की, उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रचंड मोठी आर्थिक आमिषे दाखवली जात आहेत. ते म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी किंवा वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही कधी लोकांनी बिनविरोध निवडून दिले नाही. मग या 66 लोकांचे असे काय कर्तृत्व आहे? जळगावमधील उमेदवाराला माघार घेण्यासाठी 5-5 कोटींच्या बॅगा घरपोच केल्या गेल्या. कल्याणमध्ये मनसेच्या नेत्याला दिलेला आकडा तर डोळे पांढरे करणारा आहे. ही निवडणूक नसून पैशांचा बाजार मांडला आहे.”

निवडणूक आयोगावर गंभीर ताशेरे

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत यांनी निवडणूक आयुक्तांना ‘सरकारचे हरकामे’ संबोधले.

वेळेची फेरफार: अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत असताना, त्यानंतर आलेल्या अर्जांवर मागील वेळ टाकण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून अधिकाऱ्यांना दिल्या गेल्याचा आरोप राऊत यांनी केला.

कॉल रेकॉर्डची मागणी: “निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले, तर या बिनविरोध निवडीमागील काळेबेरे आणि ‘वर्षा’ व ‘सागर’ बंगल्यावरून आलेले फोन समोर येतील,” असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस

“ज्या राज्याने देशाला लोकशाहीचे आदर्श दिले, त्याच महाराष्ट्राची प्रतिमा आज या प्रकारांमुळे धुळीस मिळाली आहे. जर उमेदवार दबावाखाली किंवा पैशांसाठी विकले जाणार असतील, तर सामान्य मतदारांनी काय करायचे? निवडणूक आयोग सध्या भाजप आणि भ्रष्ट मंत्र्यांचे नोकर म्हणून काम करत आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, बिनविरोध निवडीच्या या ‘रेकॉर्ड’वर आता सर्वच स्तरांतून संशय व्यक्त केला जात आहे.