जयगड – डिंगणी रेल्वेमार्गाला एक इंचही जागा देणार नाही….शिवसेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

जयगड – डिंगणी रेल्वेमार्गामध्ये येणाऱ्या २१ गावातील ग्रामस्थांच्या समस्या पुढील ३ महिन्यात सोडवल्या नाहीत तर या रेल्वेप्रकल्पासाठी एक इंचही जागा देणार नाही असा इशारा शिवसेनेने  दिला आहे़. शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी जयगड परिसरातील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी याबदद्ल चर्चाही केली़.

जयगड – डिंगणी या रेल्वेमार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन हस्तांतरीत करण्यात येत असून ग्रामस्थांच्या समस्यांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे जेडीआरएल कंपनी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनी जयगड रेल्वेमार्गाबाबत एक बैठक घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याची लेखी हमी घेतली़ आहे. यात पुढील ९० दिवसांमध्ये जयगड – डिंगणी रेल्वेमार्गामध्ये येणाऱ्या २१ ग्रामपंचायतींना पाणी योजना, रस्त्यांची दुरुस्ती, धार्मिक स्थळांचा विकास, रोजगार आणि ३७ लोकांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यावर जेडीआरएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या सूचनांचे पालन केले जाईल अशी हमी दिली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे ग्रामस्थांनी अन्याया विरोधात तक्रारी केल्या होत्या़. त्या तक्रारी नंतर शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत यांनी ही बैठक आयोजित केली़ होती. जयगड – डिंगणी रेल्वेप्रकल्पात रत्नागिरी तालुक्यातील १० आणि संगमेश्वर तालुक्यातील ११ ग्रामपंचायती येतात़. जेडीआरएल कंपनीला
या सर्व ग्रामपंचायतींच्या हद्‌दीत विहिरी बांधून देण्याच्या सूचना करण्यात आल्या़ आहेत.