
सामना ऑनलाईन । पणजी
पेट्रोल पंपावर पाणी, हवा आणि स्वच्छतागृहांसहित ग्राहकांना इतर मोफत सोयी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियमावली असून सुद्धा गोव्यात सदर सुविधा जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात येत आहे. गोवेकारांना अशा किरकोळ सुविधांसाठी पैसे मोजावे लागत आहे. शिवाय बहुसंख्य पंपांवर ही सुविधा बंद ठेवण्यात येत असून बाजूला परप्रांतीय टायरवाल्याना प्रस्थापित करून फायदा होऊ देत असल्याचा आरोप शिवसेनेचे गोव्याचे राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केला आहे. अशा प्रकारामुळे बाजारपेठेतील गोमंतकीय टायर पंक्चरवाल्यांचे नुकसान होत असून परप्रांतीय व्यावसायिकांची मक्तेदारी निर्माण होत आहे. शिवसेनेने सर्व तेल कंपन्यांना या प्रकाराची दखल घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून तसे पत्रच पाठवले जाणार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे. एका महिन्याच्या आत सदर मोफत सुविधांची अंमलबजावणी न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कामत यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सरकार बरखास्त करण्याची मागणी घेऊन राज्यपालांना भेटणारे काँग्रेस आता बरखास्तीला नकार देणे हास्यास्पद असुन शिवसेना बरखास्ती बाबतीत मात्र ठाम आहे आणि शिवसेनेची सह्यांची मोहीम सुरूच राहणार आहे असे मत शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसकट काही मंत्र्यांच्या आजारपणामुळे प्रशासन ठप्प झाल्याचा दावा करत सामान्य जनतेच्या स्वाक्षरी सहित राज्यपालांना सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यासाठी डिचोली बाजारपेठेतून मोहीम सुरू केली होती. पूर्ण गोव्यातील शिवसैनिक चतुर्थीचे औचित्य साधून आपापल्या भागात लोकांना भेटून सह्यांची मोहीम राबविणे चालूच ठेवणार असल्याची माहिती कामत यांनी दिली आहे. अनंत चतुर्दशी नंतर सह्यांसोबत राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामान्य जनतेमध्ये सरकार विरूध्द असंतोष खदखदत असून लोकांना ठप्प प्रशासनाचा फटका बसत असल्याची टीका कामत यांनी केली. मंत्र्यांच्या आजारपणामुळे ढिले प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताने परप्रांतीयांचे वाढते लोंढे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या, फॉर्मेलीन प्रकरणी कारवाई न करणे, बेरोजगारीची समस्या, महागाई, कायदा सुव्यवस्था प्रश्न, म्हादई पाण्याचे विभाजन, भ्रष्टाचार, धर्मांतरण अशा असंख्य मुद्द्यांवर जनतेच्या मनात सरकाराच्या विरोधात संताप उफाळून येत आहे. हा संताप शिवसेना राबवत असलेल्या सह्यांच्या मोहिमेवेळी स्पष्ट निदर्शनास येत असल्याचे कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
























































