शिवशाही बसेसना 250 सीसी क्षमतेच्या इंजिनाची ताकद, सर्वसामान्यांचा किफायतशीर प्रवास सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाच्या ताफ्यात खासगी ट्रव्हल्सवाल्यांना टक्कर देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या वातानुकूलित ‘शिवशाही’ बसेसचे सर्वसामान्यांनी चांगले स्वागत केले होते. या बसेसना लवकरच जादा 250 सीसी क्षमतेचे इंजिन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘शिवशाही’ बसेसच्या वेग आणि क्षमतेत वाढ होणार आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात दोन वर्षांपासून वातानुकूलित दर्जाच्या ‘शिवशाही’ बसेस दाखल करण्यात आल्या. या बसेसना केवळ 220 ते 225 सीसी क्षमतेचे इंजिन बसविण्यात आले आहे. तसेच या बसेस लाल डब्यांसाठीच्या पारंपरिक अँटोनी आणि अशोक लेलॅण्डच्या चेसिसवरच बांधण्यात आल्या आहेत. त्यांचा वेगही दर ताशी 80 कि.मी. इतकाच आहे. तसेच त्यांचा आकार मोठा असल्याने वळणावर चालकांना अंदाज येत नसल्याने सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर कमी क्षमतेचे इंजिन लावण्यात आले होते. आता शिवशाहीला जादा क्षमतेचे 250 सीसी क्षमतेचे इंजिन बसविण्याची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंजिन गरम होत असल्याच्या तक्रारी

‘शिवशाही’ एसी बसेसचे भाडे महामंडळाच्या प्रीमियम दर्जाच्या ‘शिवनेरी’च्या भाडय़ापेक्षा कमी आणि हिरकणी/एशियाड या सेमी लक्झरीच्या भाडय़ापेक्षा जास्त आहे. त्यामुळे कमी भाडय़ात एसीचा प्रवास हे गणित यशस्वी होत असताना या गाडय़ांचे इंजिन लवकर तापते अर्ध्या वाटेत प्रवाशांना अन्य पर्यायी बसेसची व्यवस्था करावी लागत आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात 1,500 हून अधिक ‘शिवशाही’ बसेसचा ताफा आहे.