शिवशंकरभाऊंचे सेवाकार्य सदैव भक्तांच्या स्मरणात राहील

>> राजेश देशमाने

शिवशंकरभाऊंंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर व दैनिक सामनावर प्रचंड प्रेम होते. सामना परिवारला जसे गजानन महाराजांचे भक्त तसेच शिवशंकरभाऊ विषयी प्रचंड आत्मीयता व प्रेम आहे. त्यामुळे सामनाचे संचालक, वरिष्ठ अधिकारी वर्षातून तीन-चार वेळा शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला येतात. दर्शन झाले की शिवशंकरभाऊंची भेट घेण्याबाबत वेळ ठरवण्यासाठी मला सांगायचे. भाऊही सामना परिवारातील संचालक व वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटीची वेळ देऊन संस्थानचे कार्य, अध्यात्म व सेवा यावर भाऊ बोलत राहायचे व आम्ही केवळ ऐकत राहायचो. भाऊ म्हणजे एक मॅनेजमेंट गुरुच होते, आणि सामना परिवार त्यांना नेहमी मॅनेजमेंट गुरु मानायचा. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत साहेब, सामनाचे संचालक विवेक कदम व सामनाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भागवत यांनी सामना मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील प्रशासकीय वितरण जाहिरात विभागात काम करणार्‍या प्रमुखांची शेगाव वारी करुन तेथील कामकाजाचे व भाऊंचे मार्गदर्शन घेण्याबाबत एक तीन दिवसीय कार्यक्रम ठरवण्याबाबत मला सांगीतले. मी भाऊंची भेट घेऊन हे सर्व सांगून आम्हाला संस्थानचे कार्य व तुमचे मार्गदर्शन हवे आहे त्यासाठी वेळ मागितली. भाऊंनी वेळ देऊन तारीख ठरवली. सामनातील 40 वरिष्ठ अधिकार्‍यांनी तीन दिवस शेगाव येथील संस्थानच्या कार्याचा अभ्यास केला. त्यावेळी भाऊ तीनही दिवस सामनाच्या टीम सोबत राहून मॅनेंजमेंटचे धडे देत होते. त्यानंतर सामनाच्या वाचकांसाठी गजानन विजय गाथा ही लेखमाला व त्यावर प्रश्नावलीची स्पर्धा राबविली होती. या स्पर्धेतून महाराष्ट्रातील 52 सामना वाचक निवडले गेले होते, या 52 लोकांची दोन दिवसीय शेगाव वारी व भाऊंचे मार्गदर्शन 13 डिसेंबर 2014 रोजी ठेवले होते. त्यावेळी शिवशंकरभाऊंनी या सामना वाचकांसमोर त्यांच्या कार्याचा जीवनपट सर्वांसमोर मांडला होता, यावर ते दोन तास बोलत होते आणि वाचक व भक्त ऐकत होते. त्यांच्या बोलण्यातून आलेला हा जीवनपट त्यांच्याच शब्दात मांडायचा झाला तर,  “सेवावृत्ती ही बाहेरून कोणीतरी लादायची गोष्ट नाही. ती तुमच्यात मुळातच असावी लागते, तरच ती दृढ होते” आणि असली तर संस्कारांमुळे बहरते. आमच्यात ही सेवावृत्ती रुजवली घरातल्या संस्कारांनी. साधुसंतांची निरपेक्ष भावाने सेवा करणारी आमच्या घराण्याची आजची सातवी पिढी आहे. नागझीराचे संत गोमाजी महाराज हे आमच्या घराण्याचे गुरू होते. त्यानंतर गर्गाचार्य महाराजांच्या सेवेची संधी मिळाली आणि मग गजानन महाराजांची भेट झाली. असे हे 7 पिढ्यांत संक्रमित झालेले संस्कार आहेत, त्यातून असे घडत गेलो. अगदी तरुण वयातच, जेमतेम विशीचा उंबरा ओलांडलेला होता तेव्हापासून मंदिरात सेवा दिली. बहुधा त्यांचं ते विधिलिखित असावे’ असे भाऊ म्हणाले.

शेगावातल्या शाळेत मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं. अभ्यासात फारशी गोडी नव्हती. 11 महिने खेळायचं, 1 महिना अभ्यास करायचा ही पद्धत. मॅट्रिक पास झाल्यानंतर वडिलांनी विचारलं, ‘‘पुढे काय?” तर मी म्हटलं, ‘‘तुम्ही सांगाल तसं..” ते म्हणाले, ‘‘अमरावतीला जा पुढचं शिकायला…” मात्र काही काळाने त्यांचा विचार बदलला. म्हणाले, ‘‘ते शिक्षण घेऊन तू काय करशील? सरकारी कचेरीत बाबू होशील…तसलं शिक्षण नको.” एकूण धार्मिक-आध्यात्मिक विषयांकडे माझा ओढा पाहून त्यांनीच सूचवलं की, ‘आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत जा.’ पुन्हा तोही विचार त्यांनी बदलला. त्यांना वाटलं, हा वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन साधू झाला तर घरच्या काय कामाचा राहील? घरची गडगंज शेती होती, तीच पाहावी असा शेवटी निर्णय झाला. शेतीचं काम पाहायचं म्हणजे संध्याकाळी खळ्यात जायचं. तिथे दिवाणजी, कारभारी सगळा दिवसभराच्या कामाचा तपशील सांगत. दुसर्‍या दिवशी काय करायचं ठरलं आहे याचा माहिती देत. हे सगळं ऐकायचं आणि घरी निघून यायचं. मला प्रत्यक्ष काहीच काम करावं लागत नव्हतं. मग एक दिवस वडिलांना म्हटलं, ‘‘शेतात तर मला काहीच काम करावं लागत नाही. दुसरं काही सांगा.” तेव्हा मंदिरात फरशा बसवायचं काम चालू होतं. वडील म्हणाले, ‘‘तिथे जाऊन देखरेख कर.” आणि मी मंदिरात सेवेकरी म्हणून दाखल झालो. वडिलांचे मित्र होते गफूरभाई म्हणून. ते म्हणाले, ‘‘तू आता सेवा करायला निघालाय. सेवा म्हणजे काय… नेकी कर, दरिया में डाल, भूल जा… और सेवा करते वक्त दुनिया से कुछ अपेक्षा रखोगे तो निराशा हाथ में आयेगी।” हा मला मिळालेला पहिला उपदेश. त्याचं कधी मी विस्मरण होऊ दिलं नाही.

शिवशंकरभाऊंनी व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संस्थानाचं काम विविध दिशांनी वाढायला सुरुवात झाली होतीच, मात्र या वाढीला आणि विस्ताराला भाऊंच्या कारकिर्दीत अफाट वेग आला. तोवर सेवा म्हणून भाऊंनी मंदिर बांधकामावर देखरेख, गजानन वाटिकेच्या उभारणीत सहभाग घेतला होताच. जेव्हा पुरुषोत्तम पाटील यांच्यानंतर त्यांच्याकडे हे पद चालून आलं, तेव्हा ते स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामागची कारणं सांगताना ते म्हणाले, ही जबाबदारी येण्याआधी शेगावातल्या 11 संस्थांचा पदाधिकारी म्हणून काम केलं होतं. नगरपरिषदेचा 6 वर्षं अध्यक्ष, सेल पर्चेसिंग सोसायटीचा 3 वर्षं अध्यक्ष, काॅटन जिनिंग अँड प्रोसेसिंगचा 3 वर्षं, लायन्स क्लबचा 1 वर्ष अध्यक्ष, गोरक्षण संस्थेचाही सचिव होतो, आणि शिवाय 5 धार्मिक संस्थांचा पदाधिकारी होतो. ज्या संस्था डबघाईला आल्या होत्या, बुडित होत्या, भांडणतंटे होते.. अशाच संस्थांची जबाबदारी माझ्यावर आली होती. अशा संस्थेचा मला अध्यक्ष केलं गेलं. त्या सर्व संस्था मी महाराजांच्या कृपेने वर आणल्या. नगरपरिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा तिचं वार्षिक उत्पन्न 18 लाख होतं. ते 5 वर्षात 58 लाख झालं. नगरपरिषदेच्या खात्यात रक्कम शिल्लक पडू लागली. पण ज्या संस्था सावरून मी बाहेर पडलो, त्या मी बाहेर पडताक्षणी पुन्हा मूळपदाला पोहोचल्या. आपण सावरलेली संस्था नंतर पुन्हा डबघाईला येणार असेल, तर काम केल्याचा काय फायदा? या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर, मी संस्थानाच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतो. तुम्ही सांगाल ती सेवा करीन पण हे पद नको, असं माझं म्हणणं होतं. मी ऐकत नाही हे लक्षात आल्यावर आमचे ट्रस्टी डॉ. टी.के. पाटलांना भेटायला गेले. त्यांना मी मानत असे. त्यांनी दिलेला सल्ला ऐकत असे. माझ्या नकाराचं कारण ऐकल्यावर ते म्हणाले, ‘‘हे तुमचे विचार खूप चांगले आहेत. पण या जबाबदारीला नाही म्हटल्यावर तुम्ही काय करणार आहात?” मी म्हटलं, ‘‘शेती करीन घरची.” त्यावर त्यांनी मला विचारलं, ‘‘ती शेती तरी राहणार आहे का? आपण जे शरीर जोपासतो, ते तरी राहणार आहे का? मग काहीच जर राहणार नसेल तर आत्ताच नाक का दाबून घेता?…” या प्रश्नावर मी निरुत्तर झालो. ते पुढे म्हणाले, ‘‘ईश्वरइच्छेने जे काही व्हायचं असेल ते होत राहतं. ईश्वर आपल्याला निमित्तमात्र करतो. त्याचा अहंभाव बाळगू नये आणि कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये.” ‘‘ठीक आहे” असं म्हणून त्यांच्याकडून निघालो आणि ट्रस्टींना वृत्तान्त कथन केला. म्हटलं, ‘‘डॉक्टरांनी असा सल्ला दिला असला तरी हे पद स्वीकारण्याची माझी सध्या तयारी नाही.” ट्रस्टी निघून गेले. दुसर्‍या दिवशी पहाटे डॉ. टी.के. पाटील घरी आले. ‘‘महाराजांना तुमच्याकडून सेवा हवी आहे, नाही म्हणायचं नाही. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल.” असा आदेश दिल्यावर माझं बोलणंच संपलं. थोड्याच दिवसांत जबाबदारी स्वीकारत कामाला सुरुवात केली. एकातून दुसरं काम समोर येत गेलं आणि त्या कामाला न्याय देणारी व्यक्ती भाऊंना सापडत गेली. संस्थानाचं काम दशदिशांनी वाढत असलं तरी कोणतंही काम करताना, त्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या मिळवताना, कोणत्याही राजकीय पुढार्‍याकडे शक्यतो शब्द टाकायचा नाही, नियमांत बसत असेल तर परवानगी मिळेल, अन्यथा नाही, हे भाऊंचे विचार. त्याचं कटाक्षानं पालन होतं. आज अनेक पक्षांचे राजकीय पुढारी महाराजांच्या दर्शनाला येतात, अनेकांचे भाऊंशी स्नेहसंबंध आहेत. तरीही भाऊ कुठल्याही राजकीय पक्षाच्या मंचावर कधीही दिसत नाहीत. या संदर्भात बोलताना भाऊ म्हणाले, मी कधीच कोणत्याही पक्षाच्या नेत्याला शक्यतो मंदिराचं काम करायला सांगितलं नाही. पण त्यांच्यापैकी कोणी जर दर्शनाला येणार असतील त्यांच्या स्वागतासाठी वेळेआधी हजर राहतो. मंदिराचं काम सरकारी नियमानुसार करायचं, हे पथ्य आजतागायत पाळलं. त्यासाठी कधी कोणाकडे शब्द टाकला नाही. कोणत्याही पद्धतीने त्यांना निरोप द्यायचा खटाटोप केला नाही. महाराजांची इच्छा असेल तर काम होईल, नाहीतर नाही. आपण कष्टांत आणि प्रयत्नांत कसूर करायची नाही.

संस्थानचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘सेवाधारी’ ही अतिशय स्तुत्य अशी संकल्पना. आज संस्थानाच्या सर्व उपक्रमात या सेवाधार्‍यांचा अमूल्य सहभाग आहे. 3 दिवस, 7 दिवस, 15 दिवस आणि 1 महिना असे कालावधी ठरलेले आहेत. या कालावधीत ज्याला जसा वेळ असेल तसा तो सेवेसाठी येतो. 25 सेवाधार्‍यांचा एक गट आणि प्रत्येक गटाचा एक प्रमुख अशी व्यवस्था आहे. दोन वेळचं भोजन म्हणजे महाराजांचा प्रसाद, निवासाची सोय, सेवाधार्‍याचा पोशाख आणि घरी जाताना प्रसादाचा नारळ दिला जातो. ही सेवा पूर्णपणे ऐच्छिक आहे. आज हजारो भक्त सेवा देत तर हजारो प्रतिक्षेत आहे. ही सेवाधारी संकल्पना कशी सूचली, याविषयीची हृद्य आठवण भाऊंनी सांगितली. ते म्हणाले, अन्नदान हे इथे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. दर्शनाला येणार्‍या महाराजांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, पण त्या प्रमाणात स्वयंपाकासाठी माणसं उपलब्ध नव्हती. तेव्हा काही जण म्हणायचे की बंद करा हे अन्नदान. पण मी त्याला तयार नव्हतो. यावर मार्ग काय याचा विचार करत होतो. ऋषिपंचमी म्हणजे महाराजांचा समाधी दिन. त्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येणार याची खात्री होती. तेव्हा स्वयंपाकाची काय व्यवस्था करायची, याचा विचार माझ्या डोक्यात चालू होता. माझ्या मळ्यात जवळपासच्या खेड्यातून येणारे 10-12 लोक होते. त्यांनी माझ्याकडे एक दिवस सुट्टी मागितली. मी कारण विचारलं, तर म्हणाले, ‘भाऊ, आम्ही सेवा म्हणून एके ठिकाणी पोळ्या करण्याचं काम घेतलंय.’ ते मी लक्षात ठेवलं होतं. ऋषिपंचमीचा दिवस जवळ आला, तसं त्यांच्यापैकी एकाला बोलावून म्हटलं, ‘‘रामा, तुम्हांला पोळ्या करण्याकरता यावं लागतंय…” त्यावर तो लगेच उत्तरला, ‘‘भाऊ, आम्ही तर वाटच पाहून राह्यलो, तुमी कदी बोलावता याची” त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही या, तुमच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करतो.” ऋषिपंचमीच्या आदल्या दिवशी यात्रा होती. संध्याकाळच्या वेळी आम्ही 3-4 ट्रस्टी देवळाच्या आवारात बसलो होतो. अचानक प्ाावसाची खूप छान सर आली. तर एकाने म्हटलं, ‘भाऊ, भजे करायला सांगा…’ त्याप्रमाणे भजी करायला सांगून मी पुन्हा गप्पा मारायला लागलो. आणि आपण रामाला आणि बाकीच्या मजुरांना बोलावलंय, त्याची मला अचानक आठवण झाली. ते आले की नाही पाहायला मी गेलो. ते सगळे सांगितल्याप्रमाणे आले होते आणि ते करतायत काय हे पाहायला खिडकीतून डोकावलो, तर एक विलक्षण दृश्य दिसलं. ते लाल मिलो जवारीच्या भाकरीवर मिरपूड घालून पाण्याशी खात होते. मी रामाला म्हटलं, ‘‘हे काय करून र्‍हायला तुम्ही? मी तुम्हांला इथं जेवायला बोलावलं होतं. मग हे का खाऊन र्‍हायला?” त्यावर तो म्हणाला, ‘‘सेवेकरी जेवण घेऊन आला होता… पण आम्हीच नाही म्हटलं. भाऊ, आमची सेवा उद्यापासून आहे… उद्या आम्ही सेवा करू आणि नंतर महाराजांचा भाजीभाकरीचा प्रसाद घेऊ.” त्यांचे ते भाव बघून मला गहिवरून आलं. अक्षरश: गार झालो. ही सेवाधार्‍याची वृत्ती आणि ट्रस्टी भजे पार्टीचं नियोजन करताहेत, ही गोष्ट मनाला लागली…. तेव्हापासून मी ठरवलं की आजपासून सगळं बंद. ठरवलं, याच्यापुढे वर्षातल्या महत्त्वाच्या चार उत्सवांपलीकडे देवळातलं काही घेणार नाही. बाकीचे ट्रस्टी म्हणाले, ‘मग आम्हीही काही घेणार नाही.’ ट्रस्टी बोर्डची मीटिंग बोलावली आणि त्यात सर्वांनी मिळून ठरवलं की, ‘आजच्यानंतर 4 मुख्य उत्सवांपलीकडे इथलं काही घ्यायचं नाही…’ हे ट्रस्टींनी ठरवलं, मग मी तर इथला व्यवस्थापक आहे. म्हणून मी ठरवलं की मी इथलं पाणीही पिणार नाही. आज मी इथे जे पाणी पितो ते माझ्या घरून आणलेलं असतं. पहिल्या वर्षी आमच्या शेतावरचे मजूर आले. पण दरवर्षी उत्सवाच्या वेळी येणार्‍या भक्तांची संख्या वाढतच गेली. मग आणखी काही गावातून सेवेसाठी लोक येऊ लागले. मग मंदिराचा परिसर मोठा झाला, तशी झाडण्याची पंचाईत होऊ लागली. मी रामाला विचारलं, ‘‘रामा, कसं करता येईल?” तो म्हणाला, ‘‘आमची पोरं येतील की…” मग पाच-सात मुलं आली. हळूहळू इतर गावातली तरुण मुलंही सेवा देण्यासाठी येऊ लागली. 200/250 जणांचा सेवाधार्‍यांचा ग्रुप झाला.बाहेर चांगले पगार देऊन कामाला माणसं मिळत नाहीत अशी ओरड ऐकू येते. पण आमच्याकडे उलटी स्थिती आहे. ज्याला ज्या विषयात रस आहे तिथे तो रुजू होतो. आज बाहेरही सेवा म्हणून काम करू इच्छिणारी माणसं मिळतील, पण त्यांच्या या वृत्तीला पोषक वातावरण कामाच्या ठिकाणी मिळेल का? हा खरा प्रश्न आहे.

शिवशंकरभाऊ म्हणजे एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या जीवनविषयक चिंतनाला आजवरच्या अनुभवांची व्यापक बैठक आहे. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला वजन येतं. बोलता बोलता ते खूप सहजपणे मोठा विचार देऊन जायचे.

‘नेकी कर, दरिया मे डाल’ हे सूत्र मनाशी जपत आणि आचरणात आणत तरुणपणी सुरू झालेला हा सेवेकर्‍याचा प्रवास वयाच्या पंचाहत्तरीतही चालू आहे… त्याच तटस्थपणे, त्याच निर्मोहीपणे… अशी माणसं आता होणे नाही. शिवशंकरभाऊंनी आपले संपूर्ण जीवन श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले. गजानन महाराजांसोबतच त्यांच्या कार्याचा ठसा सदैव भक्तांच्या स्मरणात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या