आईच्या मृत्यूच्या धक्क्याने बहीण-भावाची आत्महत्या, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

अडीच महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले. त्याचा विरह सहन न झाल्याने सख्ख्या बहीण-भावाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघेही अविवाहित असून, आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे त्यांच्याजवळ सापडलेल्या ‘सुसाईड नोट’मध्ये लिहिले आहे. गुरुवारी  (दि. 15) सकाळी त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत आल्याने आत्महत्येचा प्रकार समोर आला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

भूषण निळकंठ कुलकर्णी (वय 61) आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी (वय 57, दोघे रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या बहीण-भावाचे नाव आहे.

मे-2024 मध्ये आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचे निधन झाले. यानंतर एकटे पडलेले भूषण आणि भाग्यश्री हे बहीण-भाऊ नैराश्यात होते. नातेवाईक तसेच मित्रमंडळींनी त्यांना धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला होता; पण दोघेही आईच्या आठवणींतून बाहेर पडत नव्हते. दोघेही उच्चशिक्षित असून, अविवाहित होते. भूषण हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते, तर भाग्यश्री या व्यवसायाने वकील होत्या. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचे तसेच आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये, असेही म्हटले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बहीण-भावाने त्यांची सर्व संपत्ती दान केल्यासंदर्भात मृत्युपत्र लिहून ठेवल्याची चर्चा होती.