सिनेसोहळा – सुवर्णमहोत्सवी शोले

>> दिलीप ठाकूर

15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटाने भारतीय सिनेमाचा इतिहास रचला. जय, वीरू आणि ठाकूरसारखी लोकप्रिय पात्रे, खलनायक गब्बरसिंग, जबरदस्त अॅक्शन आणि लक्षवेधी संवादांमुळे रसिकप्रेक्षकांनी चित्रपटाला उचलून धरले ते आजतागायत या चित्रपटाची जादू कायम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या आणि रसिकप्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या या हिंदी चित्रपटाला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ‘शोले’ घडतानाच्या पडद्यामागच्या काही अनकट गोष्टी.

’शोले’ ठरवून बनलेला यशस्वी चित्रपट नाही. जगातील कोणत्याच भाषेतील चित्रपट तराजू/ फूटपट्टी/ मेजरमेंट लावून चांगला बनवता येत नाही. चांगला चित्रपट बनवायचा प्रयत्न करता येतो. तेही अनेक घटक जुळून आले तर! ‘शोले’त ते जमून आले आणि प्रेक्षकांना ते इतके व असे आवडले की, ‘शोले’ भारतीय चित्रपटसृष्टीतील एक माईलस्टोन चित्रपट ठरला.

निर्माते जी. पी. सिप्पी पन्नासच्या दशकापासूनच चित्रपटसृष्टीत कार्यरत. त्यांचा पुत्र रमेश सिप्पीने ‘अंदाज’पासून ( 1970)  चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. त्याचे लेखन सलीम-जावेद यांचे. त्यांचाच ‘राम और श्याम’ला (1967) नायिकाप्रधान करून ‘सीता और गीता’ (1972) आला. तोही सुपरहिट. आता यशाची हॅटट्रिक हवी. सलीम-जावेद हुशार पटकथाकार. देशविदेशातील एखाद्या चित्रपटातील ‘जर्म’ हिंदी चित्रपट शैलीत बसवण्यात ते वाकबगार.(त्याची अनेक उदाहरणे सापडतील.), पण सामर्थ्य आहे मांडणीत. नक्कल अस्सल वाटायला हवी. त्यात बदलता काळ, नवे तंत्र व नवीन पिढीतील चित्रपट रसिक यांचे भान ठेवून पटकथा लेखन व संवाद लेखन हवे. अकिरा कुरोसावा दिग्दर्शित ‘सेव्हन समुराई’ या विदेशी चित्रपटातील मध्यवर्ती कल्पना, राज खोसला दिग्दर्शित ‘मेरा गाव मेरा देश’चा (1971) चेहरामोहरा आणि पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटात हवे असलेले असे प्रेम, दोस्ती, मां, सूड असे सगळेच घटक मिसळवून ‘शोले’ लिहिला.

अमिताभचे मुंबई-बंगळुरू

रामगढला 3 ऑक्टोबर 1973 रोजी मुहूर्त करून ‘शोले’च्या चित्रीकरणास सुरुवात झाली तेव्हा तरी कुठे कोणाला माहीत होते की, हा चित्रपट ‘न भूतो न भविष्यति’ असा पाम करणार आहे? ते तर कोणीच सांगू शकत नाही. ठाकूरची विधवा सून राधा (जया बच्चन) जयला (अमिताभ बच्चन) ठाकूर बलदेवसिंग याच्या तिजोरीची चावी देते हे दृश्य चित्रीत करून ‘शोले’च्या चित्रीकरणास सुरुवात झाली. रामगढला चित्रीकरण असतानाच मुंबईत यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’चेही चित्रीकरण सुरू होतेच. निर्माता व वितरक गुलशन रॉय यांना ‘दीवार’ वेगाने पूर्ण करायचा होता आणि त्यासाठी अमिताभ बंगळुरूवरून संध्याकाळी विमान पकडून मुंबईत येऊन परळ येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत रात्री ‘दीवार’चे चित्रीकरण करून सकाळीच निघून विमानाने पुन्हा बंगळुरूला जात असे. झोप व आराम विमानात होत असे. ‘कौन बनेगा करोडपती’ या खेळात त्यानेच ही आठवण सांगितली.

‘शोले’च्या स्पर्धेत टिकून राहिला ‘जय संतोषी मां’. (तो 30 मे 1975 रोजी झळकला.) आजही या दोन चित्रपटांच्या यशाची तुलना होते. मुंबईत मिनर्व्हा, न्यू एक्सलसियर व बसंत (चेंबूर) येथे सत्तर एमएम व स्टिरिओफोनिक साऊंड सिस्टीममध्ये, तर इतरत्र पस्तीस एमएममध्ये ‘शोले’ होता. ‘शोले’ला एकमेव असा एम. एस. शिंदे यांना सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा पुरस्कार प्राप्त झाला. शिंदे यांनी आपल्या एका मुलाखतीत आवर्जून सांगितले होते, रमेश सिप्पी यांनी त्यांच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही.

‘शोले’च्या पन्नास वर्षांनिमित्त धर्मेंद्रची भेट घेऊन माझ्या कलेक्शनमधील ‘शोले’चे मिनर्व्हातील बाल्कनीचे पाच रुपये पन्नास पैशांचे तिकीट, चित्रपटाचे बुकलेट, वृत्तपत्रातील जाहिरात, फोटो अशा एक्सक्लुझिव्ह गोष्टी दाखवताच धर्मेंद्र म्हणाला, “तस्वीरे बोलती है.” त्याच्या मते चित्रीकरणाच्या वेळेस कोणीच कल्पना केली नव्हती की, हा चित्रपट असा इतिहास घडवेल. असो, पुन्हा एकदा 15 ऑगस्ट रोजी मुंबईसह देशविदेशातील मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होत असलेल्या ‘शोले’तील गब्बर असो वा ठाकूर, पडद्यावर येताच प्रेक्षकही त्यांच्यासह डायलॉग बोलतील. आपल्या देशात चित्रपट पाहणे हे एक प्रकारचे सेलिब्रेशन असते हे ‘शोले’ कायमच अधोरेखित करतो. ‘शोले’च्या न संपणाऱया गोष्टी अनेक. तूर्तास इतक्याच!

गब्बरसिंगचा शोध

पटकथा लेखन एकटाकी म्हणजे एकदा लिहिले आणि शूटिंगला लागलो असे अजिबात नसते. ते अनेकदा करावे लागते. तोपर्यंत दिग्दर्शक रमेश सिप्पीने आपल्याच ‘सीता और गीता’चे धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि जोडीला अमिताभ बच्चन यांची निवड नक्की केली. जोडीला डॅनी डेन्झोंग्पा याने गब्बरसिंग स्वीकारला. पहिलं ‘स्टोरी सीटिंग’ झालं, फोटो काढला गेला. तोपर्यंत बंगळुरुजवळील रामनगर येथे कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी ‘रामगढ’ नावाचे गाव उभारले. रणजीत मला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, “फिरोज खान डॅनीला म्हणाला, ‘शोले’त तीन नायक असताना तुझ्या भूमिकेला वाव तो किती? माझ्या ‘धर्मात्मा’त महत्त्वाची भूमिका व हेमा मालिनीच्या एका नृत्यगाण्यात तुला देखील संधी असेल आणि अफगाणिस्तानातील काबूल येथे पहिल्यांदाच भारतीय चित्रपटाचे शूटिंग होतेय. ” डॅनीला पटवण्यात फिरोज खान यशस्वी ठरल्यावर गब्बरसिंग कोण साकारणार? असा प्रश्न निर्माण झाला. रणजीतलाही विचारले गेले, पण “आपण हा चित्रपट करत नाही, असे डॅनीला लेखी सांगू दे” ही रणजीतची अट पूर्ण झाली नाही. हा शोध अमजद खानपाशी पूर्ण झाला. जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या नाटकात अमजद खानने साकारलेली भूमिका जावेद अख्तर यांनी पाहिली व अमजद खानच्या नावाचा विचार झाला. अमजदच्या पत्नीने त्याला तरुणकुमार भादुरी (जया बच्चन यांचे पिता) यांचे चंबळच्या डाकूच्या जीवनावरील ‘अभिशाप्त चंबल’ हे पुस्तक वाचायला दिले. ते त्याने इतक्यांदा वाचले की, त्याच्यात गब्बर मुरत मुरत गेला.

नवा शोले

‘शोले’ला आता नवीन रूप दिले आहे. फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले. ‘शोले’चे चित्रीकरण पस्तीस एमएममध्ये करून सत्तर एमएममध्ये ब्लोअपसाठी करण्यासाठी  लंडनमधील टेक्निकलर कंपनी लॅबमध्ये पाठवला होता. ब्रिटिश फिल्म इन्स्टिटय़ूट या संस्थेत चांगल्या चित्रपटांची साठवणूक आहे. डुंगरपूर यांनी या संस्थेला विनंती करून रमेश सिप्पी यांचे पुतणे शहजाद सिप्पी यांच्या स्टोअरेज हाऊसला भेट देऊन ‘शोले’संदर्भातील काय काय मटेरियल आहे हे पाहिले. ते मटेरियल इटलीतील बलोनिया येथे पाठवले. तेथे फिल्म रिस्टोरेशन लॅब आहे. तेथे ‘शोले’त समाविष्ट नसलेली काही दृश्येदेखील सापडली. आता पुन्हा ‘शोले’ प्रदर्शित होत असतानाच ती दृश्ये पाहायला मिळतील. या वेळी चित्रपटाचा शेवट (क्लायमॅक्स) वेगळा आहे आणि आणखी काही दृश्ये आहेत. त्यामुळेच तीन तास अठरा मिनिटांचा असलेला ‘शोले’ आता तीन तास चोवीस मिनिटांचा असेल.

सुरमा भोपाली

जगदीप याने साकारलेली सुरमा भोपालीची व्यक्तिरेखा मूळ चित्रपटात नव्हतीच. ती नंतर जोडण्यात आली. ती भोपाळमधील एका वनाधिकाऱयावर बेतली होती. सलीम जावेद यांचा त्याच्याशी परिचय होता. गंमत म्हणजे काही वर्षांनी तोच माणूस मुंबईत येऊन जगदीपला भेटला तेव्हा सलीम-जावेदवर फार रागावला होता. हा किस्सा खूपच गाजला.

रेल्वे आणि घोडेस्वार

चित्रपटातील रेल्वेचे व घोडेस्वारीचे प्रसंग तेव्हाच्या पनवेल रेल्वे स्थानक ते उरण या मार्गावरील जसई गावात चित्रीत झाले. सुरुवातीस रेल्वेच्या विशेष हॉर्स व्हॅनमधून पंचवीस-तीस घोडे आणले. त्यासह सगळ्याच प्रमुख पात्रांचे डमीज तसेच अनेक ज्युनियर कलाकार आले. रेल्वेचे मोठे स्टीम इंजिनही आणले. जसईला भराव टाकून घोडय़ांना धावण्यासाठी जागा करण्यात आली.

[email protected]