मित्रांना हाताशी घेऊन दुकानात चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यूस प्यायच्या बहाण्याने आलेल्या दोघा तरुणांनी दुकानचालकाच्या गल्ल्यातील 72 हजार लंपास केले. याप्रकरणी माहीम पोलिसांनी कसून तपास करताच ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा दुकानचालक गुह्याचा मास्टरमाइंड निघाला.

दोन तरुण ज्यूस सेंटरमध्ये गेले होते. दुकानचालक सोहेल खान याचे लक्ष नसताना त्या दोघांनी संधी साधत दुकानाच्या गल्ल्यातील रोकड पळवली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आव्हाड तसेच राणे, पवार बिरंजे व पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सोहेलकडे चौकशी केली, मात्र मला काही माहिती नाही असेच तो सांगत होता. त्यामुळे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत पथक माटुंगा स्थानकापर्यंत पोहचले. तेथील एका शौचालयाजवळ घटनेच्या दोन तास आधी सोहेल तेथे या दोघा तरुणांसोबत चर्चा करताना सीसीटीव्हीत सापडला. अधिक तपास केल्यावर चोरी करणारे तेच दोन तरुण सोहेलसोबत होते हे स्पष्ट झाले.