वेचक बातम्या – चीझ अॅनालॉगची पनीर म्हणून विक्री

चीझ अॅनालॉग पदार्थाची पनीर म्हणून विक्री करणाऱ्या अॅण्टॉप हिल येथील दुकानांवर मुंबई गुन्हे शाखेच्या सी. बी. पंट्रोल पथकाने कारवाई केली. या कारवाईत 550 किलो चीझ अॅनालॉग जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभाग पथकाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, दहिसर पूर्व येथे या दोन्ही पथकांनी छापेमारी करीत विविध पंपन्यांच्या पॅक्ड दुधाचा 478 लिटर साठा जप्त करून तो नष्ट करण्यात आला. ऐन सणासुदीत कुठल्याही प्रकारे नागरिकांना भेसळयुक्त दूध, मावा विक्री होऊ नये म्हणून मुंबई पोलीस व अन्न औषध प्रशासन सर्वत्र लक्ष ठेवून आहेत.

जमिनीच्या वादातून तरुणाची हत्या

माझगाव येथील एका सोसायटीच्या मागच्या बाजूकडील ड्रेनेज गटारामध्ये तरुणाचा मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. गावाकडच्या जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे समजते. माझगाव येथील सुर्यपुंड महापुरुष सोसायटीच्या एफ विंगच्या मागच्या बाजूला असलेल्या गटारात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मृत्यूंजय झा (36) या तरुणाचा या हत्या प्रकणात सहभाग असल्याचे समोर येताच त्याला अटक करण्यात आली.

टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगातील टेम्पोने तरुणाला चिरडल्याची घटना अंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भरतनाथ पैर बिस्ट असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाला अंबोली पोलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री भरतनाथ हा आझादनगर मेट्रो स्थानक येथून वीरा देसाई रोड येथे चालत जात होता तेव्हा समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्याला धडक दिली. त्या धडकेत भरतनाथ हा जखमी झाला. अपघातप्रकरणी अंबोली पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.