
वनप्लस कंपनीने आपली वनप्लस 13 सीरिज लाँच केली. या सीरिजअंतर्गत कंपनीने वनप्लस 13 आणि वनप्लस 13 आर हे दोन फोन लाँच केले. या फोनमध्ये अत्याधुनिक फिचर्स दिले आहेत. कंपनीने फोनच्या खरेदीसाठी 180 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसीसुद्धा आणली आहे. 10 जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोनमध्ये काही अडचण आल्यास 180 दिवसांत फोन बदलण्याची मुभा मिळणार आहे. वनप्लस 13 चा सेल 10 जानेवारीला, तर वनप्लस 13 आरचा सेल 13 जानेवारीला सुरू होणार आहे. वनप्लस 13 च्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 69,999 रुपये, तर 16 जीबी रॅम प्लस 512 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 71,999 रुपये आहे. वनप्लस 12 आरच्या 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज फोनची किंमत 42,999 रुपये, 16 जीबी रॅम प्लस 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 46,999 रुपये आहे.
ऍमेझॉनचा पहिला सेल सोमवारपासून
2025 या नव्या वर्षातला ऍमेझॉनचा पहिला सेल ग्रेड रिपब्लिक डे सेल पुढील आठवडय़ात 13 जानेवारीपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, टीव्ही, लॅपटॉप, फॅशन, होम डेकोर,
इलेक्ट्रॉनिक्सच्या अनेक उत्पादनांवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे.
ऍमेझॉनने काही निवडक बँकेच्या कार्डवर कॅशबॅक आणि डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. एक्सचेंज ऑफर सोबत नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन सुद्धा ग्राहकांना उपलब्ध असणार आहे.
ऍपलचा 185 कर्मचाऱ्यांना डच्चू
ऍपल कंपनीने 185 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांनी
चॅरिटी क्लॉजचा गैरवापर करत पगारात फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. कामांवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आर्थिक सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी कथीतरित्या कंपनी नियमांचा गैरवापर केला असे कंपनीने म्हटले आहे.
ओलाच्या सीईओला सेबीची नोटीस
ओला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाविश अग्रवाल यांना सेबीने नोटीस पाठवली आहे.
स्टॉक एक्सचेंजमध्ये फायलिंग करण्याआधी अग्रवाल यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली होती. यामुळे ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस असून भविष्यात खबरदारी घ्यावी, असे या पत्रात म्हटले आहे.
अभिनेत्री पूनम ढिल्लोच्या घरी चोरी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लो हिच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील खार येथील घरातून चोरटय़ांनी 1 लाख रुपये किमतीचे हिऱ्याचे झुमके, 35 हजार रोख आणि 500 अमेरिकन डॉलर्स लंपास केले. ही चोरी रंगकाम करण्यासाठी आलेल्या कामगारांनी केली असून याप्रकरणी पोलिसांनी समीर अन्सारी नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. पूनम जुहू येथे राहते, तर तिचा मुलगा अनमोल खार येथे राहतो.





























































