
2026 मधील पहिले सूर्यग्रहण 16 फेब्रुवारीला मंगळवारी होईल, परंतु हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण एक वर्तुळात म्हणजेच रिंग ऑफ फायरमध्ये दिसेल. हे ग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील काही भागांत दिसेल. तसेच प्रशांत, हिंद आणि अटलांटिक महासागरातील काही भागांत स्पष्टपणे दिसेल. चंद्रग्रहण हे 3 मार्च 2026 ला दिसेल.
हिंदुस्थानींसाठी इराणचा फ्री व्हिसा रद्द
इराणकडून हिंदुस्थानी नागरिकांना दिली जाणारी फ्री व्हिसा सेवा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती इराणने दिली आहे. हिंदुस्थानी नागरिकांना मोठय़ा प्रमाणात नोकरीचे आमिष दाखवून किंवा दुसऱ्या देशात घेऊन जातो, असे सांगून इराणला आणले जात आहे या घटनांत वाढ झाल्याने इराण सरकारने हिंदुस्थानी नागरिकांना दिला जाणारा फ्री व्हिसा 22 नोव्हेंबरपासून रद्द केला आहे.
मध्य प्रदेशात शाळांच्या वेळा बदलल्या
मध्य प्रदेशात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. भोपाळ, इंदूर आणि राजगड येथे मंगळवारी तीव्र थंडीची लाट आली आहे. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, देवास, झाबुआ, छिंदवाडा, सागर, शहडोल आणि खंडवा येथे शाळा उघडण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राज्यातील नऊ शहरांमध्ये तापमान 10 अंशांपेक्षा कमी झाले. राजगडमध्ये सर्वात कमी 5 अंश तापमानाची नोंद झाली.
उत्तराखंडात धबधबे आणि तलाव गोठले
उत्तराखंडमध्ये थंडीने कहर केला आहे. दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमान झपाटय़ाने घसरत आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात पारा उणे 8 अंशांपर्यंत घसरला आहे, ज्यामुळे धबधबे आणि तलाव गोठले आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिह्यातील बद्रीनाथ रस्त्यावर बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे केवळ बर्फच बर्फ दिसत होता.
हिंदुस्थान सीमेवर संशयित ताब्यात
राजस्थानच्या जैसलरमेर येथील हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर एका संशयित तरुणाला बीएसएफ जवानाने ताब्यात घेतले. या तरुणाचे नाव पंकज पुत्र सोमपाल कश्यप असे आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी आहे. पोलीस आणि एजन्सी त्याची कसून चौकशी करत आहेत. बीएसएफ जवान सीमेवर गस्त घालत असताना हा तरुण त्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करताना आढळला.




























































