
भावी पोलिसाने मैदानी धावणी चाचणीदरम्यान चीपची अदलाबदली आणि वेळेत फेरफार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी चार जणांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत.
तक्रारदार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करतात. सध्या मुंबई पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई भरती सुरू आहे. मंगळवारी तक्रारदार हे मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात हजर झाले. चाचणीसाठी काही उमेदवार हे मैदानात आले. मैदानात 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची चाचणी होती. धावणाऱया उमेदवारांना पायात चीप दिली होती. सायंकाळी धावत असताना एक उमेदवार हा खाली पडला. खाली पडल्याने तो 100 मीटर धावू शकला नाही. त्याच्या पायातील चीप काढून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
तेव्हा डय़ुटीवर असलेल्या एका महिला पोलीस शिपाई या गुणपत्रिका घेऊन सर्व्हर रूममध्ये गेल्या. त्या उमेदवाराने 100 मीटर अंतर पार केल्यानंतर त्याचे गुण जनरेट होत नव्हते. त्यामुळे महिला पोलीसने त्या उमेदवाराकडे चौकशी केली तेव्हा त्या उमेदवाराने चीपची अदलाबदली केल्याचे सांगितले. त्या माहितीनंतर महिला पोलीसने दुसऱया उमेदवाराची चीप तपासली. त्या उमेदवाराला 100 मीटर धावण्याच्या चाचणीत 15 पैकी 10 गुण मिळवून देण्यासाठी चीप बदलली. त्यानंतर आणखी दोन उमेदवारांनीदेखील 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत 400 मीटरचे 4 ऐवजी 3 राऊंड पूर्ण केला. चौथा राऊंड पूर्ण करत असताना त्या उमेदवार शॉर्टकट घेऊन ट्रकच्या बाहेर आले. चीप स्कॅन करून टाइममध्ये फेरफार करून पोलिसांची दिशाभूल केली. घडल्याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पवई पोलिसांनी चार उमेदवारांविरोधात दोन गुन्हे नोंद केले आहेत.




























































