कबड्डीची पंढरी ‘श्रमिक’च्या हीरक महोत्सवात आठवणींचा सोहळा,दिग्गजांना मानवंदना देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मी श्रमिक, माझी माती साद घालतेय!’ या भावनेला प्रतिसाद देत ना.म. जोशी मार्गावरील कबड्डी पंढरी श्रमिक जिमखान्यावर शनिवारी 11 एप्रिलला आठवणींचा महासागर उसळणार आहे. श्रमिकच्या हीरक महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आठवणींचा अल्बम उघडणारा हा केवळ एक सोहळा नसून, सहा दशकांच्या संघर्ष, जिद्द आणि जिव्हाळय़ाच्या नात्यांचा जिवंत उत्सव ठरणार आहे. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

गेल्या 60 वर्षांत या लाल मातीने कित्येक चढाया, झुंजार पकडी आणि अंगावर रोमांच उभे करणारे सामने अनुभवले. ‘कबड्डी कबड्डी’ म्हणत घेतलेला दम, जिंकण्याचा जल्लोष आणि पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याची जिद्द, हे सारे अजूनही या मातीत साठलेलं आहे. म्हणूनच या मातीचा टिळा कपाळी लावण्याचा मान आज त्या प्रत्येक खेळाडूला मिळणार आहे, ज्यांनी आपल्या घामाने या भूमीला पावन केलं.

आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने साकारत असलेला हा सोहळा भावनांचा कळस गाठणार आहे. संध्याकाळी 5 वाजता सुरू होणाऱया या कार्यक्रमात कबड्डीच्या दिग्गजांना मातीचा कलश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ते केवळ मानचिन्ह नसून, श्रमिकच्या मातीशी असलेलं नातं जपण्याचं प्रतीक ठरणार आहे.

या पवित्र मैदानाला तीन दशकांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलांचा स्पर्श लाभला होता. त्याच परंपरेचा मान राखत कबड्डीतील दिग्गजांना मानवंदना देण्यासाठी यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांची उपस्थिती सोहळय़ाला वेगळीच उंची देणार आहे.

पहिले अर्जुनवीर सदानंद शेटये यांच्यापासून ते आजच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांपर्यंत अनेक मान्यवरांना मानवंदना दिली जाणार आहे. मैदानात घाम गाळणाऱया खेळाडूंना नोकरी मिळवून देणाऱया, मैदान उभारणाऱया, रेषा आखणाऱया, पडद्यामागे राहून खेळ उभा करणाऱया कार्यकर्त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. हेच या सोहळय़ाचं खरं वैशिष्टय़ आहे.

एवढेच नव्हे तर, मुंबई संघातील रणरागिणी कबड्डीपटू रॅम्पवरून अनोखी ‘चढाई’ सादर करत श्रमिकला मानाचा मुजरा करणार आहेत. ही चढाई केवळ सादरीकरण नसेल, तर आठवणींचा, अभिमानाचा आणि कबड्डीप्रेमाचा जिवंत आविष्कार असेल. या सोहळय़ाच्या निमित्ताने कबड्डीच्या पंढरीत कबड्डी जगतातील शेकडो वारकरी एकाच क्षणी श्रमिक जिमखान्याच्या मैदानात चमकणार आहेत. त्यामुळे हा आपुलकीचा सोहळा न भुतो न भविष्यति होणार असल्याची भावना कबड्डीप्रेमी व्यक्त करत आहेत.