
इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणी अडवू शकत नाही. राजस्थानमधील 19 वर्षांच्या श्रवण कुमारने नीट यूजीसीची परीक्षा पास केली. गरिब कुटुंबातील श्रवणची कहाणी खूप प्रेरणादायी आहे.
राजस्थानच्या बालोतरा येथे राहणारा श्रवण कुमार कारखान्यात काम करत नीट परीक्षेची तयार करत होता. निकाल ऐकून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर श्रवण कुमारने ओबीसी श्रेणीत 4071 रँक मिळवला. त्याचे आई-वडील गावात लहानशा मातीच्या घरात राहतात आणि लोकांच्या घरी सण-समारंभाला भांडी घासण्याचे काम करतात. कधीकधी मनरेगाचे काम करतात. लहान असताना श्रवण कुमार आई-वडिलांना या कामात मदत करायचा. पशुपालन करायचा.
घरची आर्थिक स्थिती ठीक नसताना श्रवणने शिक्षणाची कास सोडली नाही. सरकारी शाळेतून दहावीची परीक्षा 97 टक्क्यांनी, तर बारावीची परीक्षा 88 टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. 12 वी पास झाल्यावर श्रवण पुमारला बाडमेरच्या फिफ्टी विलेजर्स सेवा संस्थानने मदतीचा हात दिला. त्याला निःशुल्क कोचिंग मिळाले. श्रवणचे नीट परीक्षेचे गुण पाहता त्याला राजस्थानमधील कमीत कमी 3 ते 4 मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर आहे.