सासवडचे वीर योद्धे गोदाजीराव जगताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेतील सर्व मावळे वीर योद्धे होते. यातीलच एक गोदाजीराव जगताप. स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर किल्ल्याच्या परिसरात सासवड भागात झाली, जी आजही गोदाजी रावांच्या पराक्रमासाठी ओळखली जाते. महाराजांसोबत सर्व महत्त्वाच्या मोहिमांमध्ये गोदाजी जगतापांचे योगदान होते. महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सेवेतदेखील गोदाजीराव जगताप यांचे नाव होते. विठुरायाच्या पंढरीला जाणारी वारी ही दिवे घाटातून जाते. या वारीच्या संरक्षणाची जबाबदारी महाराजांनी गोदाजीराव व देशमुखी असलेल्या जगताप घराण्याकडे सोपवलेली होती. सासवडमधील पुणे-बारामती मार्गावरील मुख्य चौकाच्या जवळ कऱहा नदी आहे. या नदीकाठी असलेल्या संगमेश्वर मंदिराच्या पलीकडील बाजूस गोदाजीरावांची समाधी आहे. या समाधीची नित्य पूजा होत असते. तसेच सासवड येथे युद्धप्रसंगाचा आवेश असलेला गोदाजीरावांचा पुतळादेखील उभारण्यात आला आहे.