
>>चैतन्यस्वरूप
डॉ. तुळजाराम शामलाल भोई नावाचे पुणे येथे राहणारे श्रीमहाराजांचे भक्त मोटरसायकलवरून प्रवास करीत असताना रस्त्यामध्ये अचानक आडव्या आलेल्या म्हशीला वाचविण्यासाठी, त्यांनी मोटरसायकल शेतात घातली. मात्र त्याचवेळी त्यांना एक भला थोरला नाग तिथे दिसला. एक संकट दूर व्हावे आणि दुसरे संकट समोर यावे. मात्र अशा परिस्थितीतदेखील त्या नागाच्या रूपाने साक्षात श्रीमहाराज आले आहेत असा विचार करून डॉ. भोई यांनी त्या नागास नमस्कार केला तेव्हा तो फूत्कार टाकीत तिथून सळसळत निघून गेला.
थोडय़ा वेळाने डॉ. भोई मोटरसायकल सावरत रस्त्यावर आले तेव्हा त्यांना समोर श्रीशंकर महाराज उभे असल्याचे दिसले. यावेळी श्रीमहाराज येथे कसे? ही मनातील शंका मागे सारत डॉक्टरांनी पुढे जात श्रीमहाराजांच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा श्रीमहाराज तिथून वाऱ्याच्या वेगाने नाहीसे झाले. घडल्या प्रकाराचा तर्क लावत डॉ. भोई श्रीमहाराज गेले त्या दिशेने पाहातच राहिले. श्रीमहाराजांचे वागणे अतर्क्य होते हे खरे मात्र अशा प्रसंगातून श्रीमहाराजांच्या लीलावैचित्र्याची सांगड घालणे अवघड होते हेदेखील तितकेच खरे.
सन 1915 मध्ये जन्मलेले डॉ. तुळजाराम भोई हे होमिओपॅथीचे डॉक्टर होते. त्यांनी कोलकात्याहून एम.डी. परीक्षा उत्तीर्ण केली. डॉ. भोई मूळचे आध्यात्मिक वृत्तीचे त्यातच श्रीमहाराजांचा सहवास प्राप्त झाल्यामुळे त्यांचे अवघे आयुष्यच बदलून गेले. गंज पेठेमध्ये त्यांचा दवाखाना होता. गोरगरीबांना माफक खर्चात उपचार अन् प्रसंगी मोफत औषधे देणे यामुळे त्यांच्या दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी असे.
एकदा डॉ. भोई अमरनाथच्या यात्रेला गेले असतानाचा हा प्रसंग आहे. पुण्याहून अमरनाथपर्यंतचा त्यांचा प्रवास सुखरूप पार पडला. पुढील यात्रा दरीखोऱ्यातून व खडकाळ रस्त्यावरून असल्याकारणाने हा प्रवास घोडय़ावर बसून करावा लागतो. डॉक्टरांनी घोडा ठरविला आणि यात्रेस प्रारंभ केला. थोडे दूर अंतर पार होते न होते तोच एकाएकी घोडय़ाचा पाय घसरला अन् डॉ. भोई घोडय़ासह घसरत घसरत खोल दरीत जाऊ लागले. समोर मृत्यू दिसत होता, हे पाहून डॉ. भोईंनी श्रीमहाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली आणि निमिषार्धात श्रीमहाराज तेथे उभे ठाकले. त्यांनी डॉक्टरांना व त्या घोडय़ालाही खोल दरीतून बाहेर काढले. सद्गदित झालेल्या डॉक्टरांनी श्रीमहाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवले तोच श्रीमहाराज तेथून अंतर्धान पावल्याची त्यांना जाणीव झाली.
डॉ. भोई यांच्यासोबत आणखी एक प्रसंग घडला तो असा की, एकदा डॉ. भोई अमृतसर येथे निघाले होते. मात्र आगगाडीतून प्रवास करीत असताना एकाएकी त्यांचा तोल गेला आणि ते चालत्या गाडीतून खाली पडले. त्याच वेळी त्यांच्या शेजारी उभा असलेला माणूसदेखील खाली पडला आणि दुर्दैवाने चाकाखाली आल्याने तो मरण पावला. डॉक्टरांना मात्र खाली पडत असताना श्रीमहाराजांनी अलगद उचलले आणि पुन्हा त्यांच्या डब्यात आणून बाकावर बसविले. हे सारे काही इतक्या निमिषार्धात घडले की डॉ. भोई यांना तो सहप्रवासी आपल्या सोबत पडला आणि चाकाखाली येऊन मरण पावला तरीदेखील आपण मात्र सुखरूपपणे कसे काय वाचलो याचा संदर्भ लक्षात येईना. धावत्या गाडीमध्ये श्रीशंकर महाराज कुठून आले आणि आपल्याला अलगद उचलून त्यांनी पुन्हा डब्यातील बाकावर कसे आणून बसविले याचा काही केल्या उलगडा होईना. डॉ. भोई यांच्या डोळ्यातून श्रीमहाराजांविषयीच्या अपार कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले.
तुळजाभवानी हे कुलदैवत असलेल्या डॉ. तुळजाराम भोई यांचे श्रीशंकर महाराज हे आराध्य दैवत होते. नित्यनेमाने ते श्रीमहाराजांकडे येत असत. श्रीमहाराजांनी समाधी घेतल्यानंतरही डॉ. भोई त्यांच्या या आराध्य दैवताच्या सेवाकार्यात मग्न राहिले. श्रीमहाराजांच्या समाधी मठाच्या व्यवस्थापनामध्येही ते सक्रिय सहभाग घेत असत. समाधी मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रीमहाराजांची मूर्ती तसेच त्यामागे असलेली श्रीमहाराजांची चित्रे लावण्यामध्ये पुढाकार घेणारे डॉ. भोई सन 1985 मध्ये श्रीमहाराजांचरणी कायमचे एकरूप झाले.
चैतन्यस्वरूप ([email protected])


























































