सदगुरु श्री संत फुलाजी बाबा यांचे देहावसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

अध्यात्मिक युगात क्रांती घडवून अखंड आयुष्य जनकल्याणासाठी झिजवणारे परमहंस सदगुरु श्री संत फुलाजी बाबा हे आज दिनांक २५ डिसेंबर रोजी नांदेड येथील गुरुसेवा रुग्णालयात उपचारा दरम्यान ब्रम्हलिन झाले.

त्यांचा देह भक्तांच्या दर्शनासाठी त्यांच्या अंतिम महासमाधिस्थळी श्री सिध्देश्वर संस्थान पटनापूर जि.आदिलाबाद येथे ठेवण्यात आला आला आहे, अशी माहिती सर्व मठाचे मुख्य अध्यक्ष वामनदादा इंगळे यांनी दिली असून, लाखो भाविक-भक्तांचा समुदाय अंतिम दर्शनासाठी पटनापुरात दाखल झाला.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, कर्नाटकासहा इतर राज्यात २००हून अधिक ध्यान मंदिरे उभारुन अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारे श्री संत फुलाजी बाबा लाखो भक्तगणांनी दाखवलेल्या सत्य मार्गाने जीवन जगत आहेत. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील सावळी येथे दिनांक ३० ऑगस्ट १९२५ रोजी जन्म झाला. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांना सहजयोग प्राप्त झाल्याने त्यांनी गेल्या ५० वर्षापासून अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करुन अंधश्रध्देपासून भक्तांना दूर ठेऊन खऱ्या मानव धर्माची ओळख देत सतमार्गाने जीवन जगण्याचा मंत्र त्यांनी दिला.

१९८३ साली विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी बंदी येथे पहिल्या मठाची स्थापना करुन ध्यान साधनेचा संदेश देत त्यांनी परोपकारी यात्रेला प्रारंभ केला. ५० वर्षात त्यांनी २०० पेक्षा अधिक ध्यान मंदिरे उभारुन अनेक भक्तांना व्यसनापासून दुर करीत संसारात राहुन परमार्थ करण्याचा मुळ मंत्र दिला सर्वत्र त्यांचा वर्षभर परोपकारी यात्रा महोत्सव साजरा केला जातो. असे हे महान संत समाज सुधारक श्री संत फुलाजी बाबा आज ब्रम्हलिन झाल्यामुळे लाखो भाविक-भक्तावर दुःखाचे आभाळ कोसळल्याने ५ राज्यासह सर्वच ठिकाणाहुन त्यांचे लाखो भक्त त्यांच्या अंतिम महासमाधिस्त सोहळ्यासाठी तेलंगाणा राज्यातील पटनापुर जि.आदिलाबाद येथे दाखल होत आहेत. संत फुलाजी बाबा यांनी ४० वर्षापुर्वी स्वतःची समाधी स्वतःच्या हाताने बांधून ठेवली होती. त्याच ठिकाणी अंतिम महासमाधिस्त होणार आहेत.

त्यांच्या पश्चात श्री सिध्देश्वर संस्थान सर्व पिठांचे मुख्य अध्यक्ष वामनदादा इंगळे हे त्यांचे दोन क्रमांकाचे पुत्र व ज्येष्ठ पुत्र केशवदादा इंगळे, पत्नी, दोन मुली सुना, जावई, नातवंडे व लाखो शिष्य, भक्तगण असा परिवार आहे. त्यांच्या या ब्रम्हलिन झाल्यामुळे अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दिव्यतेजाची ज्योत ब्रम्हलिन झाली, अशी भावना प्रथम मुख्य पिठाचे अध्यक्ष सुधाकर भोयर, डॉ.मुत्तेमवार, अशोक कोसले यांनी व्यक्त केली.