
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचे संवर्धन व विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या 73 कोटी रुपयांच्या निधीची कामे लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. येत्या तीन दिवसांत मंदिर समिती आराखडा तयार करून आर्किटेक्चरकडे सादर करणार आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आज मंदिर समितीच्या विश्वस्तांनी नियोजित विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, ऍड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
औसेकर म्हणाले, नियोजित विकासकामे आणि जागेची पाहणी विश्वस्तांनी केली. यात करण्यात येणाऱया विकासकामांची माहिती घेतली. यामध्ये नामदेव पायरी विकास करणे, दर्शनाची व्यवस्था, लक्ष्मीच्या जवळचा वरचा स्लॅब आदी कामांचा समावेश होता. या विकासकामांबाबत तीन दिवसांत अहवाल येणार असून, तो मंदिर समिती आर्किटेक्चरकडे सादर करणार आहोत. अहवालास मान्यता मिळाल्यानंतर तातडीने कामे सुरू करण्यात येणार आहेत.
व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली झटपट दर्शन सुरू असल्याबाबत विचारले असता, औसेकर म्हणाले, मंदिर समिती कोणत्याही प्रकारे झटपट दर्शनासाठी आग्रही नाही. मात्र, जे व्हीआयपी म्हणून येतात, एकतर ते मंत्री, खासदार, आमदार यांची शिफारस घेऊन आलेले असतात. तसेच विश्वस्तांचे नातेवाईक असतात. त्यामुळे त्यांना सोडणे क्रमप्राप्त होते. ज्याच्याकडे शिफारस नाही, त्यांना ‘व्हीआयपी’ म्हणून सोडले जात नाही. जे कोणी ‘व्हीआयपी’च्या नावाखाली मंदिर समितीची दिशाभूल करून, तसेच पैसे घेऊन दर्शनासाठी सोडत असतील, अशा लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. नुकतीच खासगी एजंटांवर कारवाई करण्यात आली असून, यात समितीमधील कोणी सहभागी असेल, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही औसेकर यांनी सांगितले.
‘पेड दर्शना’बाबत मंदिर समिती विचार करेल
शुल्क भरून दर्शनासाठी भाविक उत्सुक आहेत. त्यामुळे शिर्डी, तुळजापूर, जेजुरीप्रमाणे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातही ‘पेड दर्शन’ व्यवस्था सुरू करावी. पेड दर्शनामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नातही भर पडेल, असे विचारले असता, याबाबत मंदिर समिती नक्कीच विचार करेल, असे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी संगितले.

























































