शृंगारपूर शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवार मागणी करूनही शाळेत शिक्षक मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संगमेश्वर तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा शृंगारपुरला ग्रामस्थांनीच टाळे ठोकले. हा प्रकार समजताच मध्यस्तीसाठी गेलेल्या केंद्रप्रमुखाना आक्रमक ग्रामस्थांनी काढता पाय घ्यायला लावला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श केंद्र शाळा शृंगारपुर ही जिल्हा परिषद मार्फत चालवली जाते. ही शाळा सातवीपर्यंत असून पटसंख्या 41 आहे. सातवीपर्यंतच्या या शाळेसाठी 4 शिक्षक मंजूर आहेत. यात पदवीधर शिक्षकाचाही समावेश आहे. या शाळेत यावर्षीच्या जूनपासून केवळ 2 शिक्षक कार्यरत होते. यात पदवीधर शिक्षक नसल्याने तो देण्यात यावा यासाठी ग्रामस्थ शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत होते.

गणपतीच्या सुट्टीनंतर येथे कार्यरत असलेल्या 2 शिक्षकांची बदली झाली. यानंतर खरा गोंधळ सुरू झाला. सुट्टी लागण्यापूर्वी आजूबाजूच्या दोन शाळांमधील शिक्षक तात्पुरते येऊन मुलांना शिकवत होते. गणपतीची सुट्टी संपल्यानंतर शाळेत एकही शिक्षक हजर झाला नाही. यामुळे शाळा सुरू होऊनही मुले रिकामी येऊन बसत होती. म्हणून ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत वस्तुस्थिती सांगितली. मात्र तिथून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी शाळेलाच कुलूप ठोकले.

हा प्रकार समजताच सकाळी साडे अकरा वाजता शृंगारपुर केंद्राचे प्रमुख महेश जाधव एक शिक्षक घेऊन मध्यस्थी करण्यासाठी गेले. त्यांनी आज एक शिक्षक हजर करत आहोत सोमवारी दुसरा शिक्षक हजर करतो असे सांगून हे आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. मात्र आक्रमक ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. आज शाळा बंद केल्यावर तुम्हाला जाग आली का असा सवाल उपस्थित करण्यात आला. दोन्ही शिक्षक एकाचवेळी हजर करा तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पाहून केंद्रप्रमुख आल्या पावली रिकाम्या हाताने माघारी गेले. दरम्यान येथे पदवीधर शिक्षक नसल्याने मुलांचा अभ्यासक्रम बराच मागे राहिल्याचे पालकांनी सांगितले. ज्या वेळी दोन कार्यरत शिक्षक गेले त्यावेळी शाळेत कुणीही नसताना प्रशासनाने इकडे लक्ष दिले नाही. उलट आम्हीच दोन शिक्षकाना विनंती करून शाळेत आणल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आज घडलेल्या प्रकारामुळे आता शिक्षण विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.