छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य छिंदमविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shripad-chhindam

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या विरोधात पोलिसांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

छिंदम याने दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याला काम न झाल्याप्रकरणी शिवीगाळ व दमदाटी केलेली होती. त्याच वेळेला त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फोनद्वारे अपशब्द वापरले होते. त्या घटनेची व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. अनेक हिंदुत्ववादी संघटनेने या घटनेचा निषेध सुद्धा केलेला होता तर दुसरीकडे अपशब्द वापरल्याप्रकरणी त्याच्या कार्यालयावर सुद्धा त्यावेळला हल्ला करण्यात आला होता.

पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. दोन वर्षांपासून त्याच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले नव्हते. या संदर्भामध्ये पोलीस विभागाने गृहविभागाकडे यासंदर्भातला विषय घेऊन मार्गदर्शन मागवले होते. मागील आठवड्यामध्ये विभागाने दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी दिली होती

तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी हे 60 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक तेढ तसेच सामाजिक एकोपा धोक्यात येईल, अशी वर्तवणूक केल्याचा आरोप छिंदम याच्यावर दोषारोपत्रामध्ये ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, छिंदम विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास गृहविभागाने नुकतीच परवानगी दिली होती. शासकीय पदावर असल्या कारणाने भादंवि कलम 196 (1) अ प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृहविभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृहविभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी यासाठी परवानगी दिली. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी आज न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.