सामना प्रतिनिधी । नगर
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या भाजपाचा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदमने महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रभाग 9 क मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे. अनेक इच्छुकांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज भरून ठेवले आहेत. शुक्रवार पासून अनेकांनी ऑफलाइन पद्धतीने निवडणूक अधिकार्यांकडे अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यात शुक्रवारी सकाळी श्रीपाद छिंदमने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी प्रभाग 10 अ मधून तर त्यांच्या पत्नी शीला चव्हाण यांनी प्रभाग 9 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग 14 मधून गणेश भोसले, भगवान फुलसौंदर, सुरेखा भोसले, प्रभाग 13 मधून गणेश कवडे, सुभाष लोंढे, बिज्जा, चितळे यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, प्रभाग 9 मधून छिंदम विरोधात कोण उमेदवारी करणार याकडे लक्ष लागले आहे. वास्तविक पाहता महानरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उपमहापौरपद भाजपाला गेल्यावर खासदार दिलीप गांधी यांनी छिंदम याला उपमहापौरपद द्यावा असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे धरुन त्याला हे पद दिले होते. वर्षभरानंतर छत्रपती शिवाजी महाराजबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी छिंदमला भाजपामधून हाकलून देण्यात आले, मात्र त्याच्याबद्दलचा वाद आता हा लाल फितीच्या कारभारामध्ये अडकला गेला आहे. उपमहापौरपदाची निवडणुक झाल्यावर त्या वेळेला याचे प्रायश्चित म्हणून भाजपाने उपमहापौरपदाची निवडणुक लढवली नाही, मात्र, आता छिंदमने निवडणुकीसाठी अर्ज भरल्यामुळे भाजप त्याच्या समोर उमेदवार देईल का? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.































































