
मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट, चतुरस्र अभिनेते, परखड विचारवंत, आपल्या अद्वितीय अभिनय सामर्थ्याने एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला हिमालयाची उंची देणारे ज्येष्ठ रंगकर्मी नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे मराठी नाटय़, चित्रपट क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही शोककळा पसरली. त्यांच्यामागे पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू, डॉक्टर मुलगा आनंद लागू असा परिवार आहे.
श्रीराम लागूंच्या अनेकविध भूमिकांमधले वैविध्य अचंबित करणारे होते. लागूंनी पु.लं.च्या ‘सुंदर मी होणार’ मध्येही काम केले. सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारित ’ सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटकही वैचारिक वर्तुळात गाजले. शिवाय ’मित्र’मधूनही वेगळे लागू पाहायला मिळाले. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध होते. देवाला रिटायर करा’ या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती.
विचारस्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य
सार्वजनिक महत्त्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्त्व देणारे श्रीराम लागू यांनी अनेक सामाजिक, राजकीय बाबींवर परखड प्रतिक्रिया नोंदविली. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार देऊन करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. तसेच सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांना गौरविले होते.
मुलाच्या स्मरणार्थ ‘तन्वीर सन्मान’
श्रीराम लागू यांच्या तन्वीर या मुलाचे तरुणपणीच मुंबईतील लोकलवर मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन निधन झाले. त्याच्या स्मरणार्थ डॉ. लागूंनी स्थापन केलेले ‘रूपवेध प्रतिष्ठान’ हे 2004सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ पुरस्कार देते.
साहित्य क्षेत्रातही योगदान
- डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे.
- ‘लमाण’ हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी 2004 मध्ये प्रकाशित केले.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भरीव योगदान
‘देवाला रिटायर करा’ या भावनेतून डॉक्टर श्रीराम लागू यांनी कायमच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गुरुवारी अंत्यसंस्कार
डॉक्टर श्रीराम लागू यांचा मुलगा अमेरिकेहून परतल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारामध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती रूपवेध प्रतिष्ठानच्या विश्वस्त दीपा लागू आणि शुभांगी कानेटकर यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
या सम हाच! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आदरांजली
मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. ‘झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. लागू यांनी साकार केलेला ‘नटसम्राट’ अविस्मरणीय असल्याचे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. पण ‘पिंजरा’मधील ‘मास्तर’ आणि ‘सिंहासन’मधला ‘मंत्री’ त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला. डॉ. लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील.






























































