श्रीरामपूर- लॉकडाऊन परिस्थितीही दोन गटांत तुफान हाणामारी, एक जण गंभीर जखमी

कडक संचारबंदी असतानाही पूर्ववैमनस्यातून खैरीनिमगाव (ता. श्रीरामपुर) येथे दोन गटात तुफान मारामारी झाली. यावेळी केलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला असून याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून पोलिसांनी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली आहे.

शहरातील पंजाबी कॉलनीत राहणाऱ्या हॅपी उर्फ अमरप्रितसिंग सरबतसिंग सेठी याच्या मालकीचा खैरीनिमगाव येथे फार्म हाऊस आहे. हॅपी, त्याचा मित्र कृष्णा सतिष दायमा व हरजितसिंग चरणसिंग चुग हे तिघे तेथे गेले होते. हॅपी सेठी याचे पूर्वीपासून गोंधवणी येथील सागर विजय धुमाळ, अंकुश रमेश जेधे व नमोद अरुण कांबळे, महेश बोरुडे यांच्याशी वाद आहेत. हे देखील सेठी याच्या फार्म हाऊसवर गेले. तेथे त्यांच्याच वाद झाले. यावेळी हाणामारी व चाकू हल्ला झाला. आरोपी सागर धुमाळ याने दोन लाख रुपयांची मागणी केली. ती दिली नाही म्हणून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. मात्र सावधगिरी बाळगल्याने गोळी लागली नाही, असे सेठी याने फिर्यादीत म्हटले आहे. सागर धुमाळ याने दुसरी फिर्याद दिली असून मागील भांडणाच्या वादातून हॅपी सेठी याने चाकूने व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यात खूनाचा प्रयत्न, मारहाण, भारतीय हत्यार अधिनियम आदि कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. महेश बोरुडे हा जखमी असल्याने त्याला लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात गोळीबार झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या