अंतराळातील खवय्ये! कोळंबी क्रॅकर्स, आंबटगोड चिकन, स्विट ब्रेड.. शुभांशू शुक्ला आणि टीमची भन्नाट मेजवानी

मोहीम कुठलीही असो, अस्सल जातीच्या खवैय्याला खाण्याशिवाय चैन पडत नाही. हेच तंतोतंत लागू पडते, अंतराळवीर शुंभाशू शुक्ला आणि त्यांच्या टीमलाही. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या ऑक्सिओम-4 मिशनने 25 जूनला ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळात उड्डाण केले. हा प्रवास तब्बल 14 दिवसांचा होता. हा प्रवास आता पूर्णत्वास यायला अवघे काही तास उरले आहेत. 14 जुलैला शुभांशू शुक्ला आणि त्य़ांचे इतर सहकारी परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. दरम्यान इतक्या मोठ्या मोहिमेवरून परतण्याच्या काही दिवस आधी, त्यांनी आणि इतर क्रू सदस्यांनी एका मेजवानी आस्वाद घेतला. यांसदर्भातील काही फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामध्ये कोळंबी क्रॅकर्स, आंबटगोड चिकन, प्रक्रिया केलेले मास, स्विट ब्रेड यासारख्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.

शुभांशू शुक्ला आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांनी एकत्र मेजवानीचा आनंद लुटला. यावेळी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता.अंतराळात जाण्यापूर्वीच शुभांशू शुक्ला आणि त्यांच्य़ा टीमने खाण्याचे काही हलके फुलके पदार्थ नेले होते.

1984 मध्ये राकेश शर्मा नंतर, हिंदुस्थानी हवाई दलाचे पायलट आणि अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळात उड्डाण करणारे दुसरे हिंदुस्थानी आहेत. (11 जून) पासून ते स्पेसएक्स रॉकेट आणि अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेसाठी क्रू ड्रॅगनने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) प्रस्थान केले होते. त्यांच्यासह फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर तीन अंतराळवीरांनी उड्डाण केले होते.

मोहिमेबद्दल शुभांशू शुक्ला यांच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला या मोहिमेसाठी अंतराळामध्ये आमरस, मूग डाळ हलवा, गाजर हलवा घेऊन गेले होते. नासाने गुरूवारी शुक्ला आणि इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास 14 जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.