
हिंदुस्थानच्या टी-20 संघापासून काहीसा दूर असलेल्या शुभमन गिलला पुन्हा एकदा या वेगवान क्रिकेटचे वेध लागले आहेत. इंग्लंड दौऱयात चार शतकांसह 754 धावा करत ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा मान मिळवणारा कसोटी कर्णधार शुभमन गिल आगामी आशिया कपसाठी संघात परतण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल.
आयपीएल 2025मध्ये 156 स्ट्राईक रेटसह 650 धावा व सहा अर्धशतके ठोकणारा गिल वनडेतील जोरदार कामगिरीनंतर (55 सामन्यांत 2,775 धावा) टी-20 संघात उपकर्णधारपदाचाही दावेदार मानला जात आहे.
मागील वर्षी टी-20 विश्वचषकात तो मुख्य संघाऐवजी राखीव खेळाडू म्हणून संघासोबत होता. त्यानंतर दुखापतींमुळे तो अनेक टी-20 सामन्यांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. 28 सप्टेंबरला आशिया कप फायनलनंतर लगेच वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे निवड समितीसमोर सर्वोत्तम संघ निवडण्याचे आव्हान आहे. पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱया टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आशिया कपही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या संघात यशस्वी जैसवाल आणि शुभमन गिल दोघांपैकी एकाला संधी मिळते की दोघेही सलामीला एकत्र उतरतात, हे लवकरच दिसेल.