
आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरणावर तीव्र टीका करत जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्र्यांना उद्देशून म्हटले की, “डोनाल्ड ट्रम्पचे तोंड बंद करा किंवा मॅकडोनाल्ड बंद करा.”
दीपेंद्र हुडा यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सवाल उपस्थित करताना यूपीए सरकारच्या काळातील परराष्ट्र धोरणाचा दाखला दिला. “आमच्या काळात जेव्हा डोळ्यात डोळे घालून बोलण्याची वेळ आली, तेव्हा आम्ही अमेरिकेला डोळे दाखवले आणि जेव्हा हातमिळवणीची वेळ आली, तेव्हा हातही मिळवला. मुंबई हल्ल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले होते की, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे सुरक्षित ठिकाण खपवून घेतले जाणार नाही. पण आता भाजपचे परराष्ट्र धोरण बदलले आहे. संघाचे धोरणही बदलले आहे का? तुम्हाला हे ठरवता येत नाही की, अमेरिकेशी हातमिळवणी करायची की डोळे दाखवायचे,” असे हुडा यांनी ठणकावले.
हुडा पुढे म्हणाले की, हिंदुस्थान एक महासत्ता आहे आणि अमेरिकेने हे समजून घ्यावे की, हिंदुस्थान आणि पाकिस्तानला एकाच तराजूत तोलता येणार नाही. अमेरिकेला ठरवावे लागेल की, त्यांना हिंदुस्तानशी कसे संबंध हवे आहेत. जेव्हा तुर्कीने पाकिस्तानला मदत केली, तेव्हा पंतप्रधान सायप्रसला गेले, हा चांगला संदेश होता. पण खरा शत्रू चीन आहे. त्यांना संदेश द्यायचा असेल, तर तैवानला जा. पण परराष्ट्र मंत्री बीजिंगला गेले आणि म्हणाले की, आमचे संबंध सुधारत आहेत. हे धोरण काय आहे?” असे त्यांनी विचारले.