
हिंदुस्थान – चीन यांच्यामध्ये सीमेवरून वाद निर्माण झाला आहे. हिंदुस्थानात चीनविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याप्रसंगी या वादाचे इफेक्ट हिंदुस्थानातील बॅडमिंटनपटूंवर होऊ लागले आहेत. बॅडमिंटन या खेळाला लागणारे शटल्स हे चीनमधून आयात केले जातात. केंद्र सरकारकडून चीनमधील वस्तूंच्या आयातीवर बंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानातील सर्वच स्तरांवरील बॅडमिंटनपटूंना शटल्सची कमतरता जाणवू लागली आहे. कोरोनामुळे सध्या स्पर्धा होत नाहीत, पण आगामी स्पर्धांच्या सरावासाठी हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंना शटल्स हवे आहेत. हिंदुस्थानी सरकार तसेच इतर संबंधितांनी यावर तोडगा काढायला हवा. हिंदुस्थानात शटल्सचे उत्पादन होऊ शकते का यावर विचार करायला हवा.
जून महिन्यानंतर शटल्सचा स्टॉक आलेला नाही
जगातील 90 टक्के शटल्सचे उत्पादन चीनमधील कंपनीमधून करण्यात येते. शटलसाठी लागणारा कच्चा माल चीनमध्ये तयार होतो. हिंदुस्थानातील राष्ट्रीय खेळाडू योनेक्स शटल्सचा वापर सरावासाठी करतात, पण जगभरातील शटल्स विकणाऱया डीलर्सकडून यावेळी सांगण्यात आले की, जून महिन्यानंतर चीनकडून पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शटल्सचा स्टॉक संपत चाललाय.
ऍकॅडमी, ट्रेनिंग सेंटरमध्ये जुन्या स्टॉकमधील शटल्सचा वापर
राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यावेळी म्हणाले की, पुढल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकडे बघता हिंदुस्थानातील खेळाडूंना सरावासाठी पुरेशी शटल्स उपलब्ध व्हायला हवीत, अन्यथा सरावावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, सध्या देशातील विविध ऍकॅडमी व ट्रेनिंग सेंटरमध्ये जुन्या स्टॉकमधील शटल्सचा वापर करण्यात येत आहे.



























































