अजय जयरामला उपविजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हो ची मिन्ह सिटा

हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू अजय जयरामला व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. किताबी लढतीत इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्ताकियो याने अजयवर अवघ्या 28 मिनिटांच्या लढतीत 21-14, 21-10 अशी सरळ गेममध्ये मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 2-5 असे पिछाडीवर पडल्यानंतरही अजय जयरामने 9-10 असे अंतर कमी करण्यात यश मिळविले. मात्र रुस्तावियोने वेळीच कामगिरी उंचावत पहिला गेम 21-14 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तर जयराम इंडोनेशियन खेळाडूपुढे साफ निप्रभ ठरला. जयरामच्या प्रत्येक चुकीचा फायदा उठवीत रुस्तावियोने दुसऱ्या गेममध्ये सहज बाजी मारीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या मोसमात अजयला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याआधी व्हाईट नाईट चॅलेंजर्स स्पर्धेतही अजयला अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. गतवर्षी झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर अजयने यंदाच्या कर्षी यशस्वी पुनरागमन केले आहे. मात्र दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही त्याला विजेतेपदाला गवसणी घालता आली नाही. जयराम व रुस्तावियो यांच्यातील ही दुसरी लढत होती. रुस्तावियोने 2013 साली थायलंड ओपन स्पर्धेत अजय जयरामकडून झालेल्या पराभवाचा यावेळी बदला घेतला.

तीन आठवडय़ांत तिसरी फायनल
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंनी मागील तीन आठवडय़ांत तिसऱ्यांदा एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. गेल्या रविवारी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला विश्क चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्पेनची कॅरोलिना मारिनकडून हार पत्करावी लागली होती. त्याआधी हिंदुस्थानचा सौरभ वर्मा याने रशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम लढत जिंकून विजेतेपद पटकावले होते.