संत गाडगेबाबा – खरे लोकशिक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत गाडगेबाबा हे केवळ एक व्यक्ती नाही तरी एक विचार आहे. हा विचार समतावादी, विवेकवादी आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे. समाजाला धार्मिक, आर्थिक, मानसिक भ्रमातून मुक्ती देणारा हा विचार आहे. माणसाला केंद्रबिंदू ठरवत इथल्या धर्मवेडय़ा पाखंडी व्यवस्थेचे बुरुज उद्ध्वस्त करण्याची ताकद संत गाडगेबाबांनी कीर्तनातून समाजात पेरली. त्यांनी कधीही शाळेची पायरी चढली नव्हती. रस्त्याच्या शाळेत आणि दुनियेच्या विद्यापीठात शिकलेला हा खरा लोकशिक्षक होता. या महानायकाने देशभरात समाजप्रबोधनाचा प्रकाश वाटला, अनेक नामवंत विद्यापीठांना जे शक्य झाले नाही ते या लोकविद्यापीठाने करून दाखवले.

 पूर्वीच्या काळात मूलबाळ होत नाही, आजारपणातून सुटका व्हावी, लग्न जुळावं म्हणून जत्रेच्या ठिकाणी नवस केला जायचा. नवस म्हणून कोंबडी, बकरी या प्राण्यांचा बळी दिला जात होता. गाडगेबाबांना हा प्रकार किळसवाणा वाटला. देव थोडा बकरा मागतो? मुक्या जिवाची हत्या ही देव भक्ती थोडीच आहे? हे तर माणसाच्या जिभेचे चोचले आहेत. गाडगेबाबांनी याविरुद्ध बंड करायचं ठरवलं. एकदा बकऱ्याची मिरवणूक वाजतगाजत जत्रेत चालली होती. हे बघून गाडगेबाबा म्हणाले, थांबा थांबा, मी इथिसा बकर कापू देत नाही.

 ‘काहून?’

देव कोंबडी, बकर मांगते काय? कोणाच्या स्वप्नात येऊन बकरं काप, असं देवानं म्हटलं काय? काऊन मुक्या जनावराचा जीव घेता बापहो? कोंबडं-बकरं कापून पोरं होता काय? कोणाची बिमारी जाते काय? कोंबडं-बकरं कापून देव प्रसन्न झाला काय? हे जुनी रीत आहे; सोडून द्या बकरं. मी मुक्या जिवाले मारू देणार नाही. गाडगेबाबा मोठय़ाने ओरडले… असं करू नका बाप हो… त्या बकऱ्याच्या बदल्यात महा जीव घ्या. मी मोठा बकरा आहे. मी हात जोडतो तुम्हाले… गाडगेबाबांच्या बोलण्यावर लोकांचं मतपरिवर्तन झालं. सुरा गळून पडला. लोक बाजूला झाले. बकरा फासावरून सुटल्यासारखा मोकाट पळत सुटला आणि ‘गोपाला… गोपाला’चा जयघोष झाला. अशा प्रकारे पशू बळीचा प्रकार गाडगेबाबांनी प्रयत्नपूर्वक बंद पाडला. या घटनेचा परिणाम असा झाला की अनेक गावच्या पशू हत्या कायमच्या बंद झाल्या.

जन्मभरी पोसे । लेकुराच्या परी ।

हाती घेऊनी सुरा ।

उभा राहे । असा कसा रे तुमचा देव ।

घेतो बकऱ्याचा जीव ।।

आजच्या विज्ञान युगातही चांगली सुशिक्षित माणसं उपवास, श्राद्ध, व्रत यांना बळी पडतात.

यावरून त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

सोप्या भाषेतून गाडगेबाबांनी लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. गाडगेबाबांनी पुणे येथे गोसाव्याच्या मशानातील जागेवर धर्मशाळा बांधून त्यांनी दिलेला कृतीशील संदेश समाजाला नव निर्मितीकडे, विज्ञान वादाकडे  येणार होता. ज्या जागेवर मशानभूमी होती त्या जागेवर धर्मशाळेची उभारणी करणे हा जो विचार आहे तो विचार कर्मकाळ, अंधश्रद्धा मुक्त समाज, नवसमाज निर्मितीकडे टाकलेले दिशादर्शक पाऊल होय. गाडगे महाराजांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळाली आहे. 20 डिसेंबर 1956 साली गाडगे महाराज अनंतात विलीन झाले.

>> सिद्धार्थ अशोक तायडे